जामखेड नगरपरिषद निवडणूक : भाजपा, सेना, रिपाइंची महायुती

By Admin | Updated: December 15, 2015 23:14 IST2015-12-15T22:59:40+5:302015-12-15T23:14:16+5:30

जामखेड : जामखेड नगरपरिषदेसाठी भाजपा, शिवसेना व रिपाइं यांची महायुती जिल्हा पातळीवरील झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या चर्चेतून अस्तित्वात आली.

Jamkhed Municipal Council elections: BJP, Army, RPI Mahayuti | जामखेड नगरपरिषद निवडणूक : भाजपा, सेना, रिपाइंची महायुती

जामखेड नगरपरिषद निवडणूक : भाजपा, सेना, रिपाइंची महायुती

जामखेड : जामखेड नगरपरिषदेसाठी भाजपा, शिवसेना व रिपाइं यांची महायुती जिल्हा पातळीवरील झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या चर्चेतून अस्तित्वात आली. त्यानुसार भाजपाने पहिली सात जणांची यादी जाहीर केली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेने स्वतंत्र मेळावा व मुलाखती घेऊन स्वबळाची भाषा केली होती. परंतु विधानपरिषद निवडणुकीत जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची युती झाल्यामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी युतीबाबत जिल्हा पातळीवर पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भगवान बेरड शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, सेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यात चर्चा होऊन भाजप १४, शिवसेना ६, रिपाइं १ असे जागा वाटप होऊन महायुती जाहीर झाली.
जिल्हा पातळीवर झालेल्या युती संदर्भात तालुका पातळीवर भाजपा व शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु तालुका सेनानेते जिल्हाध्यक्ष गाडे यांना भेटण्यास गेल्याने ते आले नाहीत. भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे व युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी जिल्हा पातळीवरील चर्चेची माहिती दिली. तालुका सेना नेते नसल्यामुळे थेट शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला. त्यानुसार गाडे यांनी सेनेला सहा, भाजप १४ व रिपाइं १ अशी युती चर्चेअंती ठरली. प्रभागाबाबत निर्णय घेण्यासाठी तालुका सेनेला नगर येथे चर्चेला बोलावले आहे, असे सांगण्यात आले.
जिल्हा भाजपाने जाहीर केलेली यादी तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी वाचून दाखवली. यामध्ये प्रभाग एकमधून वर्षा श्रीराम डोके, प्रभाग चार- शिल्पा विक्रांत घायतडक, प्रभाग पाच- वर्षा कैलास माने, प्रभाग आठ- दत्तात्रेय भिमराव ढवळे, प्रभाग तेरा- अमित अरुण चिंतामणी, प्रभाग सोळा - वैशाली ज्ञानेश्वर झेंडे, प्रभाग सतरा- सय्यद हसीना अकबर अशा सात जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. लवकरच उर्वरित यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Jamkhed Municipal Council elections: BJP, Army, RPI Mahayuti