उघड्यावरचे पदार्थ आजाराला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:28+5:302021-08-18T04:27:28+5:30
अहमदनगर : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर गर्दी वाढली आहे. आता दिसेल तिथे खाद्यपदार्थांची रेलचेल वाढली आहे. ...

उघड्यावरचे पदार्थ आजाराला निमंत्रण
अहमदनगर : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर गर्दी वाढली आहे. आता दिसेल तिथे खाद्यपदार्थांची रेलचेल वाढली आहे. ज्यांच्याकडे कोरोना नियमांचे पालन केले जाते, तसेच स्वच्छता राखली जाते, अशा ठिकाणी खाणे चांगले आहे, मात्र जिथे नियमांचे पालन केले जात नाही, खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जातात, अशा ठिकाणचे खाद्यपदार्थ खाल्ले तर नक्कीच टायफाईड सारख्या आजाराला निमंत्रण आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने चौपाटीवर, रस्त्याच्या कडेला उघड्यावरच खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. यातील अनेक दुकानांवर स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान नगर जिल्यात टायफाईडच्या रुग्णांची संख्या सध्या तरी कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.-------
आजाराची लक्षणे
ताप येणे, उलटी, हगवण लागणे ही टायफाईड आजाराची सर्वसाधारण लक्षणे आहेत.
काही रुग्णांमध्ये सात ते आठ दिवसांपर्यंत ताप येतो.
कधीकधी टायफाईडचा ताप रुग्णाच्या मेंदूपर्यंंत जातो.
टायफाईडमुळे पोटांच्या आतड्यांना ही त्रास होऊ शकतो.
----------
ही घ्यावी काळजी
टायफाईड हा आजार प्रामुख्याने दूषित अन्न, दूषित पाण्याच्या सेवनामुळे होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे.
खानपानाचे योग्य नियोजन करून, आरोग्यास लाभदायी असलेल्या पौष्टिक आहाराचे नागरिकांनी सेवन करावे. तसेच पिण्याचे पाणीदेखील स्वच्छ ठेवावे.
टायफाईडचे रुग्ण कमी झाले आहेत. औषधोपचार चांगल्या दर्जाचा असल्याने रुग्ण सहज बरे हाेत आहेत. असे असले तरी आजार होऊ नये, यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेत सकस आहार व नियमित व्यायाम या नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.
--
डमी क्रमांक-१०४७