दहा कोटींनी वाढला ग्रामपंचायत कर

By Admin | Updated: September 19, 2016 00:11 IST2016-09-19T00:10:11+5:302016-09-19T00:11:30+5:30

अहमदनगर : ग्रामपंचायतींच्या हद्दीत भांडवली मूल्यावर (सुधारित) पध्दतीने कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजपत्रात कर आकारणीचा मसुदा प्रसिध्द करण्यात आला होता.

Gram Panchayat tax increased by 10 crores | दहा कोटींनी वाढला ग्रामपंचायत कर

दहा कोटींनी वाढला ग्रामपंचायत कर

अहमदनगर : ग्रामपंचायतींच्या हद्दीत भांडवली मूल्यावर (सुधारित) पध्दतीने कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजपत्रात कर आकारणीचा मसुदा प्रसिध्द करण्यात आला होता. सुधारित पध्दतीने कर आकारणीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ग्रामपंचायत कर २७ कोटी ९४ लाख होता. आता त्यात वाढ होवून तो ३८ कोटी ३५ लाख रुपये झाला आहे. ग्रामपंचायतींच्या कर आकारणीत यंदा १० कोटी ४० लाखांची घसघशीत वाढ झाली आहे.
दर चार वर्षानी प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणाऱ्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कर आकारणीबाबत सुधारणा करावी लागत होती. आता तर राज्य सरकारने यासंदर्भात सुधारित कर आकारणीचा मसुदा राजपत्रात प्रसिध्द केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत नमुनानंबर ८ व नमुनानंबर नुसार माहिती संकलित करण्याची कार्यवाही करण्यात आली. पूर्वी ग्रामपंचायतींच्या हद्दीत क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी होत होती. आता भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
मात्र, ग्रामपंचायतींचा सेस कर आणि दिवबत्ती कर जुन्याच पध्दतीने आकारणी होणार असून १९७० पूर्वीच्या बांधकामांना किमान कर आकारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही रेडीरेकनर आकारण्यात येत असून त्यासाठी सात टप्पे करण्यात आले आहे.
एखाद्या गावात तीन ते चार प्रकारात रेडीरेकनर आकारला जाणार आहे. या कर आकारणीसाठी प्रत्येक गावात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून त्यात उपसरपंच, बांधकाम खात्याचे अभियंता, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून कर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक प्रकारानुसार कर आकारणी होणार आहे.
(प्रतिनिधी)
भांडवली पध्दतीने कर आकारणी केल्यामुळे यंदा ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार आहे. वाढलेला कर हा ग्रामनिधी म्हणून संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावरच राहणार आहे. ग्रामीण भागातही रेडीरेकनर आकारणी करण्यात आली आहे.
-प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.

Web Title: Gram Panchayat tax increased by 10 crores