राहुरी येथील किराणा मालाचे व्यापारी रमेश ताथेड हे आपल्या बसस्थानक येथील किराणा दुकानातून गोणीमध्ये काही साहित्य घेऊन शांती चौकातील दुसऱ्या दुकानात जात होते. दरम्यान एका स्पीड ब्रेकरजवळ पल्सर गाडी घेऊन एक भामटा त्यांना आडवा झाला. पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवू लागला. तुमच्या गोणीत गांजा असल्याची माहिती मिळाली असून तुमची झडती घ्यायची आहे, असा दम भरला. हे चालू असताना त्याने ताथेड यांना अगोदर गोणी रिकामी करायला सांगितले. नंतर गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी गोणीत टाकण्यास सांगितली. दरम्यान काही क्षणाच्या आत भांबावलेल्या ताथेड यांच्याकडून त्या भामट्याने गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी घेऊन पोबारा केला.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस काॅन्स्टेबल डी. के. आव्हाड पुढील तपास करीत आहेत.