"याचे कपडे काढून मारा"; ४ शिक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, दाखला देईन धमकीमुळे विद्यार्थी गप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:31 IST2025-12-03T19:28:58+5:302025-12-03T19:31:23+5:30
अहिल्यानगरमध्ये चार शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र)
Ahilyanagar Crime: शिक्षणाच्या मंदिरातच एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'तू आमचा टेबल का तोडला? असा प्रश्न विचारत नेवासा तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेतील चार शिक्षकांनी सातवीच्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या जबाबावरून सोनई पोलिस ठाण्यात रविवारी शिंदे सर, काळुखे सर, दरंदले सर आणि विरकर सर यांच्यासह तिघा शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती.
हात पिरगळला, बुक्क्यांनी मारले; वर्गातच क्रूरता
पीडित विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या सविस्तर जबाबात या क्रूर मारहाणीचा प्रकार सांगितला. तो वर्गात बसलेला असताना शिंदे सर आले आणि त्यांनी "तू टेबल तोडला काय?" अशी विचारणा केली. विद्यार्थ्याने 'मला माहिती नाही' असे उत्तर दिल्याने शिंदे सरांना तीव्र राग आला. त्यांनी विद्यार्थ्याचा हात पिरगळून त्याला बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वर्गात झालेल्या आरडाओरड्यामुळे इतर शिक्षक, काळुखे सर, दरंदले सर आणि विरकर सर, तिथे धावले. तितक्यात दरंदले सरांनी विद्यार्थ्याचे केस ओढले. तर काळुखे सरांनी याचे कपडे काढून मारा, असे म्हटले. त्यानंतर विरकर सरांनी यानेच टेबल तोडला आहे, असे म्हणत विद्यार्थ्याला चिमटा घेतला, तसेच पाठीवर चापटी मारली.
मारहाण असह्य झाल्यामुळे विद्यार्थी कसाबसा वर्गातून बाहेर पडला. त्यावेळी काळुखे सरांनी त्याला 'तू नीट राहा, नाहीतर तुझा दाखला तुझ्या हातात देईन,' अशी थेट धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या विद्यार्थ्याने घरी आल्यावर आई-वडिलांना काहीही सांगितले नाही. घरी आल्यावर त्याला मारहाणीमुळे त्रास होऊ लागला, तेव्हा त्याने मेडिकलमधून गोळी घेऊन वेदना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच्या खांद्याची आणि कंबरेची वेदना वाढल्याने त्याने अखेर आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आई-वडिलांनी तात्काळ त्याला सोनई पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता, डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले. गेल्या तीन दिवसांपासून या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्याच्या जबाबावरून चारही शिक्षकांविरुद्ध बाल न्याय अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.