बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:42 IST2023-03-09T17:39:49+5:302023-03-09T17:42:19+5:30
चौकशीमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयामध्ये येणाऱ्या महिला शिक्षिका, वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी प्रवासादरम्यान बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका स्वतःच्या मोबाईलवरून व्हायरल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
अन्ना नवथर -
अहमदनगर - बारावीच्या पेपर फुटीप्रकरणी रुईछत्तीसी येथील प्राचार्यसह पाच जणांना मुंबईतील क्राइम ब्रांचने अटक केली आहे. त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी किरण संदीप दिघे ( 28, शिक्षिका रा.बालिकाश्रम रोड अहमदनगर ) अर्चना बाळासाहेब भांमरे (23 , कर्मचारी,भांमरे कॉलेज रा. रुईछत्तीसी ता. जिल्हा अहमदनगर), भाऊसाहेब लोभाजी अमृते (54, प्राचार्य रा. वाटेफळ ता. जिल्हा अहमदनगर), वैभव संजय तरटे ( 21, चालक रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर), सचिन दत्तात्रेय महारनवर ( 23, पिटी शिक्षक रा. थेरगाव ता. कर्जत जिल्हा अहमदनगर) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर येथील डॉक्टर अॅन्टिनिओ डिसील्वा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, या परीक्षा केंद्रावर 3 मार्च रोजी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला. त्याच्याकडे गणिताची प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे आढळून आली होती. याबाबत परीक्षा केंद्राचे पर्यवेक्षक यांनी शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस सह आयुक्त यांनी याबाबत तपास करण्याची आदेश पोलिसांना दिले होते. पोलीस निरीक्षक अजित गोंधळी यांच्या नेतृत्वाखालील दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. हा तपास करत असताना गणिताची प्रश्नपत्रिका अहमदनगर येथून व्हायरल झाल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे मुंबई येथील पोलिसांचे पथक नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावात असलेल्या मातोश्री भागुबाई भामरे, कृषी व विज्ञान महाविद्यालयात पोहोचले. पोलिसांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांची कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयामध्ये येणाऱ्या महिला शिक्षिका, वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी प्रवासादरम्यान बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका स्वतःच्या मोबाईलवरून व्हायरल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.