जिल्ह्यातील पंधरा हजार ग्राहकांनी पाठवले ऑनलाइन रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:57+5:302021-06-04T04:16:57+5:30

वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय ...

Fifteen thousand customers in the district sent online readings | जिल्ह्यातील पंधरा हजार ग्राहकांनी पाठवले ऑनलाइन रीडिंग

जिल्ह्यातील पंधरा हजार ग्राहकांनी पाठवले ऑनलाइन रीडिंग

वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रीडिंग पाठविण्याची मुदतदेखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारेदेखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी नाशिक परिमंडळात मागील एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये मे महिन्यात जवळपास ४० टक्के संख्येने म्हणजे आठ हजारांनी वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप, www.mahadiscom.in किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच रीडिंग पाठविता येत आहे.

महावितरण मोबाइल ॲॅपमध्ये ‘सबमिट मीटर रीडिंग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच रीडिंगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमिट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगिन करून www.mahadiscom.in वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्यासाठी MREAD असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रीडिंग सबमिट करता येईल. त्यामुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Fifteen thousand customers in the district sent online readings