श्रीगोंदा : जिल्ह्यातील बहुतांश सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय सभासदांनी घेतला आहे. त्याप्रमाणे नागवडे सहकारी कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली.
नागवडे कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी ऑनलाईन पार पडली. यावेळी ते बोलत होते.
नागवडे म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सतत ऊस पुरवठा करणाऱ्या बिगर सभासद शेतकऱ्यांना सभासद करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या उपपदार्थ विक्री करताना बाजारभाव स्थिर नसतात. याचा परिणाम उसाच्या भावावर होत आहे. मात्र कमी कालावधीत जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्याचा विस्तार करण्याचा विचार आहे.
आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, सभेत बोलण्याचा विचार नव्हता. परंतु, संचालक मंडळातील नाराजी बघून हवालदिल झालो आहे. कारखान्याचा विस्तार करण्यास आमची हरकत नाही. परंतु, उसाची उपलब्धता, पाण्याचे नियोजन या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच विस्तार करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. नाही तर हा निर्णय कारखाना सभासदांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, ॲड. विठ्ठलराव काकडे, श्रीपाद खिस्ती, बाळासाहेब काकडे, लक्ष्मण नलगे, हरिश्चंद्र धांडे, रमेश गायकवाड, हनुमंत झिटे, कुंडलिक भोसले, निळकंठ जंगले आदी सहभागी झाले होते. प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले. प्रा. सुनील माने यांनी आभार मानले.
---
१२ कोटींचा खर्च १५ कोटींवर कसा गेला..
कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर म्हणाले, स्व. बापूंच्या काळात सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन कारभार होत असे. परंतु, आता कोणतेही निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, यावर खंत व्यक्त केली. इथेनॉल प्रकल्पाची ३ कोटी खर्चाची अंदाजित रक्कम तब्बल १२ कोटींनी वाढून १५ कोटींवर कशी झाली? असा प्रश्न उपस्थित केला.