दोघांच्या भांडणात जामखेड शहराचा विकास थांबला; एकनाथ शिंदे यांची राम शिंदे, रोहित पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:45 IST2025-11-25T17:42:06+5:302025-11-25T17:45:55+5:30
मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

दोघांच्या भांडणात जामखेड शहराचा विकास थांबला; एकनाथ शिंदे यांची राम शिंदे, रोहित पवारांवर टीका
DCM Eknath Shinde: जामखेडमध्ये सत्तेची लढाई सुरू आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध ही लढाई जिंकायची आहे. इथे अनेक समस्या आहेत. जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे हे घडत आहे. एकाने निधी आणला, की दुसन्याने हाणून पाडायचे. दोघांच्या भांडणात योजना बंद पडल्या. इथे सत्तेची आणि स्वार्थाची लढाई सुरू आहे. आपल्याला येथील राजकीय मक्तेदारी मोडीत काढायची आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोघांवरही टीका केली.
जामखेड येथे झालेल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. शिवसेनेच्या हातात नगरपरिषद सत्ता द्या, तुमचे रस्ते, पाणी, गटार योजना पूर्ण करण्याचे आश्वासन देतो असे ते म्हणाले. राजकारणाची मक्तेदारी मोडीत काढून सामान्य माणसाला विकासाचा केंद्र बिंदू मानून विकासासाठी परिवर्तन करावयाचे आहे. नगर विकास खाते माझ्याकडे आहे. शहरात चांगले गार्डन, रस्ते दिल्या शिवाय राहणार नाही, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
"मी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. शिवसेना नेहमी अॅक्शन मोडवर असते. मी सभेला येणार नाही अशा अफवा पसरवल्या होत्या. मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.