'मंत्रालयातील ओळख' पडली महागात! मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगून सरकारी ठेकेदारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:56 IST2025-10-16T17:54:26+5:302025-10-16T17:56:51+5:30
अहिल्यानगरमध्ये माजी मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगून दोन कंत्राटदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

'मंत्रालयातील ओळख' पडली महागात! मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगून सरकारी ठेकेदारांची फसवणूक
Ahilyanagar Crime: माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगून मंत्रालयातून इलेक्ट्रिक हायमॅक्सची कामे मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत अहिल्यानगरमधील दोन ठेकेदारांची साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०२४ ते २०२५ दरम्यान येथील मार्केटयार्ड येथील हरितक्रांती इमारतीत घडला. याप्रकरणी एकावर कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यामुळे मंत्रालयातून कामे मंजूर करून देणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
असिफ अत्तार खान असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. सचिन गोरख रासकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची आरोपीने १ लाख ४० हजारांची, तर गणेश काळे यांची ८ लाखांची फसवणूक केली आहे. वर्षभरापूर्वी सचिन रासकर आणि गणेश काळे यांची मुंबईतील मंत्रालयात असिफ खान याच्यासोबत ओळख झाली होती.आरोपीने मी अब्दुल सत्तार यांचा भाचा आहे. तुम्हाला मंत्रालयातून अल्पसंख्याक विभागातून इलेक्ट्रिक हायमॅक्स बसविण्याच्या कामाची मंजुरी मिळवून देतो, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाइन १ लाख ४० हजार रुपये घेतले. काळे यांच्याकडून रोख स्वरुपात ८ लाख रुपये घेतले असून, इतर काही ठेकेदारांचीही फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.