व्यापाऱ्याला मारहाण; राहुरीत संतापाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:46+5:302021-07-27T04:21:46+5:30

राहुरी : शनिवारी व रविवारी दुकान उघडे ठेवले म्हणून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी नवीपेठेतील व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार ...

Beating the merchant; A wave of anger in Rahuri | व्यापाऱ्याला मारहाण; राहुरीत संतापाची लाट

व्यापाऱ्याला मारहाण; राहुरीत संतापाची लाट

राहुरी : शनिवारी व रविवारी दुकान उघडे ठेवले म्हणून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी नवीपेठेतील व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे राहुरीतील व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, डॉ. विजय मकासरे यांच्यासह व्यापाऱ्यांनी राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शनिवारी व रविवारी शासनाने कडक लॉकडाऊन पाळण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व दुकाने बंद राहतात. नवीपेठ भागातून पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना एका व्यापाऱ्याचे दुकान उघडे दिसले. त्यास त्यांनी बोलावून घेतले. दंड भरण्यास सांगितले. संबंधित व्यापाऱ्याने माझे दुकानावर आवरायचे काम चालू आहे. आता दुकान बंद करणार आहे, असे सांगताच पोलिसांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर सर्व व्यापारी एकत्र येऊन पोलीस स्टेशनवर जमा झाले. कोणत्या नियमातून व्यापाऱ्याला मारहाण केली. दंड करा, पण मारहाण करायचे कारण काय? अशी विचारणा करून संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी माफी मागितल्याशिवाय उठणार नाही, असा इशारा दिला. अखेर पोलीस निरीक्षक यांनी माफी मागितली. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, बाळासाहेब उंडे, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, अनिल सबलोक, विलास तरवडे आदी उपस्थित होते.

...............

कायदेशीर कारवाई करून दुकान सील करायला हवे होते. दंड करायला हवा होता. परंतु, दुकान सील न करता कायद्याचा गैरवापर करून व्यापाऱ्यास मारहाण करणे चुकीचे आहे. व्यापाऱ्याची माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

-प्रकाश पारक, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन

..................

शनिवारी व रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही दुकाने उघडी होती. नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाईसाठी गेलो होतो. मी व्यापाऱ्यास मारहाण केलेली नाही.

- नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, राहुरी

260721\img-20210725-wa0185.jpg

व्यापाऱ्याला मारहाण केल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट ,पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे

Web Title: Beating the merchant; A wave of anger in Rahuri