महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई

By Admin | Updated: October 8, 2014 00:24 IST2014-10-07T23:41:29+5:302014-10-08T00:24:06+5:30

अहमदनगर : राज्यावर अफजलखानाचे संकट आले आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई आहे. निष्ठावंतांची सेना फक्त शिवसेनेकडेच आहे.

Battle for keeping Maharashtra united | महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई

महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई

अहमदनगर : राज्यावर अफजलखानाचे संकट आले आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई आहे. निष्ठावंतांची सेना फक्त शिवसेनेकडेच आहे. मुख्यमंत्रिपदासारखा उमेदवार कोणाकडेही नाही. काँग्रेसकडे बिनकामाचा बाबा, तर राष्ट्रवादीकडे धरणं भरणारा दादा आहे. आता तुमचा मुख्यमंत्री कोण? असा सवाल करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह दोन्ही काँग्रेसवर निशाणा साधला.
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेद्वारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची गांधी मैदानात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, युती तोडायची शिवसेनेची अजिबात इच्छा नव्हती. पहिल्या तीन पिढ्यांनी युती जपली. मात्र भाजपाच्या नव्या पिढीने युती तोडली. त्यांनी आमच्याशी असलेली युती तोडली नाही, तर ती भगव्याशी, हिंदुत्त्वाशी असलेली युती तोडली आहे. त्यांचे कमळ आता भगवे राहिले नसून पांढरे झाले आहे. लोकसभेत त्यांचे खासदार निवडून आले ते शिवसेनेमुळेच. त्यावेळी आमचा उपयोग करून घेतला. आता शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागत आहेत. ‘महाराष्ट्र माझा’ हा दीन-दलितांचा, गोर-गरिबांचा महाराष्ट्र आहे.
भाजपाने कधी शिवजयंती साजरी केली का? आता कोठून त्यांना शिवछत्रपती आठवले? आजपर्यंत कोणत्याही गडावर न गेलेले भाजपावाले आता मतांसाठी नवे गड शोधून काढतील. जो महाराष्ट्राची सेवा करतो, त्यालाच छत्रपतींचे आशीर्वाद मिळतील, असे सांगत ठाकरे यांनी भाजपाचे शिवछत्रपती प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट केले.
२५ वर्षांनंतर आम्ही एकटे लढतो असलो तरी आम्ही एकटे नाही, तर जनता आमच्या पाठीशी आहे. पश्चिम महाराष्ट्रात धनगर, महादेव कोळी समाजाचे लोक येऊन भेटले. आमचे नेते कुठेही जाऊ द्या,समाज म्हणून आम्ही शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे वचन त्यांनी दिले आहे. जैन, राजस्थानी, गुजराथी समाज सेनेसोबत आहे.
व्यापारी टॅक्स भरायला तयार आहे. मात्र सरकारने वसुलीची पद्धत क्लिष्ट करून टाकली. व्यापाऱ्यांचा फक्त छळच सुरू आहे. व्यापारी काही गुन्हेगार नाहीत. सेनेचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा एलबीटी रद्द केला जाईल,असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. व्हीजन डॉक्युमेंटची माहिती देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा समावेश असलेला टॅब्लेट देण्याची घोषणाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Battle for keeping Maharashtra united