पावसाचे आगमन.. खरीप पिकांना नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:17+5:302021-08-18T04:27:17+5:30
अहमदनगर : दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारी पावसाचे आगमन झाले. यामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ...

पावसाचे आगमन.. खरीप पिकांना नवसंजीवनी
अहमदनगर : दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारी पावसाचे आगमन झाले. यामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा, कुकडी धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पाठ फिरविली आहे.
हवामान विभागाने यंदाही गतवर्षीप्रमाणेच पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार अगदी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचीही मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. कपाशी, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन, तूर अशी पिके जोमात होती. नंतर मात्र पाऊस अचानक गायब झाला. त्यातच जोराचा वारा व उन्हाचा चटका यामुळे पिके सुकू लागली होती. जवळपास दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके सुकू लागली. बहुतांश भागातील मूग निघूनही गेला. तरीही पाऊस आला नाही. अखेर सोमवार सायंकाळपासून पाऊस सुरू झाला. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता.
श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, कर्जत, जामखेड, पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, पाथर्डी, नगर आदी तालुक्यांमध्ये रिमझिम सुरू होती. सायंकाळनंतर काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमीच आहे. पाऊस आला असला तरी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे.
----
धरणांतील पाणीसाठा (दलघफू)
भंडारदरा : ९७४६
निळवंडे : ५४६९
मुळा : १७८४४
घोड : २३६५
सीना : १०५९
विसापूर : ३१.९८
-----
दीर्घ विश्रांतीनंतर वरूणराजाने लावलेली हजेरी शेतकऱ्यांना आणि शेती पिकांना दिलासादायक आहे.
कोमेजलेल्या पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे; मात्र अजूनही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
-सोपान जाधव,
प्रगतशील शेतकरी, बक्तरपूर, ता. शेवगाव.
------
माना टाकून दिलेल्या पिकांना या पावसाने उभारी मिळेल; मात्र सरासरी उत्पन्नात होणारी घट आता भरून येऊ शकत नाही. अनेक शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पन्न मिळेल, याची अपेक्षा सोडून दिली आहे. पुढील पिकांसाठी तसेच पाणी पातळीत वाढ होण्यासाठी मात्र जोरदार पावसाची गरज आहे.
-भाऊसाहेब सुपेकर,
प्रगतशील शेतकरी, भावीनिमगाव, ता. शेवगाव.