संगमनेरातील कोविड केंद्रात ५८ बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:04+5:302021-03-25T04:21:04+5:30

संगमनेर : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातील विशेष कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...

Arrangement of 58 beds at Kovid Center at Sangamnera | संगमनेरातील कोविड केंद्रात ५८ बेडची व्यवस्था

संगमनेरातील कोविड केंद्रात ५८ बेडची व्यवस्था

संगमनेर : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातील विशेष कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. एकूण ५८ बेड असलेल्या या केंद्रात अत्यवस्थ रूग्णांसाठी आठ आयसीयू बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोरोनाबाधितांना खासगी रूग्णालयात उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातील बंद केलेले विशेष कोविड आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करावे, याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. २२) हे केंद्र सुरू करण्यात आले. कोरोनाची लागण झालेले ३५ जण या केंद्रात उपचार घेत आहेत. या रूग्णांवर येथे मोफत औषधोपचार केले जातात.

दिनांक १ जून २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान हे केंद्र सुरू होते. कोरोनाची लागण झालेल्या तीन हजारहून अधिक रूग्णांनी येथे उपचार घेतले. गरजूंसाठी हे केंद्र संजीवनी ठरले होते. फेब्रुवारी महिन्यात रूग्णसंख्या कमी झाल्याने केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा रूग्णसंख्या वाढल्याने ‘लोकमत’च्या वृत्ताची प्रशासनाने दखल घेत, हे केंद्र पुन्हा सुरू केले आहे. याठिकाणी एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचारी रूग्णांना सेवा देत आहेत.

.....

शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातील विशेष कोविड -१९ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. अत्यवस्थ रूग्णांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

- डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधीक्षक, घुलेवाडी ग्रामीण रूग्णालय, संगमनेर.

Web Title: Arrangement of 58 beds at Kovid Center at Sangamnera