चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:40 IST2025-03-06T21:39:25+5:302025-03-06T21:40:14+5:30

इयत्ता पहिली ते चौथीपर्यतची ही द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. शाळेतील मुले बाहेर मैदानावर खेळत होते. त्यावेळी ही घटना घडली.

An incident of a teacher sexually assaulting four female students in Ahilyanagar | चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

अहिल्यानगर: पारनेर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षकाने शनिवारी (दि. १) इयत्ता पहिली ते चौथीच्या चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना सांगितली. त्यानंतर एका पालकाने शिक्षकाला गावातच बेदम चोप दिला. विशेष म्हणजे शिक्षक त्याच गावातील आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला असून पालकांचे जबाब नोंदवून शिक्षकावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

इयत्ता पहिली ते चौथीपर्यतची ही द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. शाळेतील मुले बाहेर मैदानावर खेळत होते. त्यावेळी शिक्षकाने इयत्ता पहिली ते चौथीतील चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी गेल्यावर पालकांना सांगितला.

पालकांचा जबाब नोंदवून कारवाई करणार

बुधवारी (दि. ५) सकाळी काही पालक माझ्याकडे तक्रार करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्या तक्रारीनुसार त्या शिक्षकालाही चौकशीसाठी बोलावणार होतो. मात्र, या घटनेतील मुलींचे पालक तक्रार देण्यास तयार नाहीत. त्यांचा जबाब नोंदवून प्राथमिक शिक्षकाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचेही सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले.

शिक्षण विभागाकडे व्हॉट्सअॅपवर तक्रार...

प्राथमिक शाळेतील शिक्षकाने केलेल्या या गैरकृत्याबाबत विस्तार अधिकारी व आमच्याकडे व्हॉट्सअॅपवर पालक व शालेय शिक्षण समितीने तक्रार केली आहे. आवक-जावकमध्ये ही तक्रार अद्यापपर्यंत आलेली नाही. ही तक्रार दाखल होताच अधिक चौकशी करून कारवाईबाबत अहवाल वरिष्ठांना पाठविला जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी सांगितले.

...अन् दुसऱ्यांदा केले अश्लील चाळे

याच ज्येष्ठ शिक्षकाने याअगोदर ४ महिन्यांपूर्वी, असेच कृत्य केले होते. त्यावेळीही पालकांनी त्याला चोप दिला होता. त्याने माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला होता. शनिवारी (दि. १) पुन्हा त्याच ज्येष्ठ शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केले. त्या शिक्षकाचा विकृत चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Web Title: An incident of a teacher sexually assaulting four female students in Ahilyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.