वयाच्या चाळिशीनंतर हवा वाहन परवाना,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:31+5:302021-08-19T04:25:31+5:30
स्टार १०६० श्रीरामपूर : वयाच्या चाळिशीनंतर वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर चालकांना एमबीबीएस ...

वयाच्या चाळिशीनंतर हवा वाहन परवाना,
स्टार १०६०
श्रीरामपूर : वयाच्या चाळिशीनंतर वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर चालकांना एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. पूर्वी हे प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने द्यावे लागत होते. आता मात्र ते ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वयाच्या चाळिशीनंतर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या नागरिकांनाच वाहन चालविण्याचा परवाना देण्यात यावा असे परिवहन विभागाचे धोरण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची चाळिशीतील नागरिकांकडून मागणी केली जाते. मात्र केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने वाहन परवान्यासाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. त्यामध्ये घरबसल्या परवाना काढणे शक्य झाले आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील ऑनलाइन सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना एक युजर आयडी व पासवर्ड दिला जातो. त्यानंतर प्रमाणपत्र अपलोड करावयाचे असते. नूतनीकरणासाठी हीच पद्धती वापरली जाते.
---------
ऑनलाइन परवाना
वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. तेथे एजंटांकडून वाढीव पैसे उकळल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे परिवहन मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली आहे.
---------
वयाची अशी अट
वाहन परवान्यासाठी किमान वयाची १६ वर्षे पूर्ण केलेली असावी.
कोणत्याही वयापर्यंत परवाना काढता येतो.
चाळिशीनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते.
---------
डॉक्टरांना २० प्रमाणपत्रे देता येणार
पूर्वी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरांकडील वैद्यकीय प्रमाणपत्र नागरिकांकडून दिले जात होते. मात्र त्यावर आक्षेप घेतले गेले. त्यानंतर केवळ एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. एका डॉक्टरांना दिवसातून केवळ २० प्रमाणपत्रे देण्याची मुभा आहे.
----------
वयाच्या चाळिशीनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता ही अट पूर्वीपासूनच आहे. त्यात नवे काहीही नाही. मात्र आता ते ऑनलाइन मागविता येणार आहे.
-गणेश डगळे, सहायक परिवहन अधिकारी,श्रीरामपूर.
--------