१५ वर्षाच्या मुलीला रुमवर आणलं, अंगावर बसला अन् केले गळ्यावर वार; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 21:58 IST2025-10-05T21:51:35+5:302025-10-05T21:58:04+5:30
अहिल्यानगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करुन तिच्या गळ्यावर वार करण्यात आले.

१५ वर्षाच्या मुलीला रुमवर आणलं, अंगावर बसला अन् केले गळ्यावर वार; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचे कृत्य
Ahilyanagr Crime: अहिल्यानगर शहरातील एका १५ वर्षीय मुलीला खोलीवर नेऊन तिच्यावर निर्दयीपणे चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी ११ वाजेदरम्यान भिस्तबाग महाल परिसरात घडली. दरवाजा उघडून सुटका केल्याने मुलगी बचावली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. हा हल्ला महेश माणिक भेटे याने केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सचिन लक्ष्मण पोटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते सावेडीतील भिस्तबाग येथील इस्कॉन मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहतात. शनिवारी दुपारी घरी असताना त्यांना त्यांच्या मागील बाजूच्या खोलीतून मोठ-मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. म्हणून त्यांनी मागे जाऊन पाहिले तेव्हा महेश भेटे याच्या खोलीबाहेर लोक जमले होते. लोक खिडकीतून बघून मागे सरकत होते आणि मारले मारले म्हणून ओरडत होते. नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा महेश भेटे मुलीच्या अंगावर बसलेला होता. तो त्याच्या हातातील धारदार चाकू निर्दयीपणे मुलीच्या गळ्यात खुपसत होता. हा सगळा प्रकार पाहून सचिन यांनी रुममालकाला फोन केला व लाथ मारून दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मुलगी उठून बाहेर आली.
तिच्या गळ्याला जखम झाली होती ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ती प्रचंड घाबरलेली होती. तिच्या तोंडातून निघत नव्हता. हातवारे करून ती रस्त्याने पळत सुटली. तिच्या पाठीमागे महेशसु्द्धा हातात चाकू घेऊन पळाला. महेश भेटे याने चाकूने हल्ला करत मुलीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित मुलगी शहरातील एका शाळेत अकरावीत शिकते. रूमवर गेल्यानंतर भेटे याने तिच्यावर चाकूने वार करत तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याने टोकाचे पाऊल का उचलले त्यामागे नेमके काय कारण असावे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस हल्ल्यामागील कारणाचा शोध घेत आहेत. घटनेपूर्वी अल्पवयीन मुलगी आरोपीसोबत दुचाकीवरून आली होती. रूम बाहेर दुचाकी उभी करून ते दोघे आत गेले. त्यानंतर त्यांच्यात काय बोलणे झाले ते माहीत नाही. मात्र काही वेळाने भेटे याने चाकूने मुलीच्या गळ्यावर सपासप वार केले असून, या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी महेश भेटे याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर आहे. जामिनावर सुटल्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला रूमवर नेऊन तिच्यावर हल्ला केला. ही मुलगी आरोपीच्या संपर्कात कशी आली? ती त्याच्यासोबत रूमवर का आणि कशासाठी गेली होती, याचा पोलिस शोध घेत आहेत.