बघण्याच्या कार्यक्रमादिवशी पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली; अज्ञात वाहनाने तरुणीला उडवल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:12 IST2025-10-04T16:10:49+5:302025-10-04T16:12:57+5:30
अहिल्यानगरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला.

बघण्याच्या कार्यक्रमादिवशी पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली; अज्ञात वाहनाने तरुणीला उडवल्याने मृत्यू
Ahilyanagar Accident: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणीचा अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगरच्या नेवासा येथे घडली. सुप्रिया आदिनाथ पवार (वय १९) असे मृत तरुणीचे नाव आहे. शेवगाव रस्त्यावर 'हॉटेल जयराज' नजीक शुक्रवारी सकाळी सहा वाजेदरम्यान ही घटना घडली.
भानसहिवरे येथील सुप्रिया पवार हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. ती यापूर्वी कधीही मॉर्निंग वॉकला गेली नव्हती. मात्र, शुक्रवारी सकाळी ६ वाजता ती नेवासा-शेवगाव रस्त्यावर फिरण्यासाठी गेली होती. घरी परत येताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची 'हॉटेल जयराज 'जवळ तिला जोरात धडक बसली. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला तातडीने उपचारार्थ नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला मृत घोषित केले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भानसहिवरे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया पवार हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. शुक्रवारी तिला पाहुणे पहायला येणार होते. सुप्रिया पवार हिच्या लग्नाचे नियोजन घरात सुरू होते. घटनेच्या दिवशीच शुक्रवारी तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. त्याच्या नियोजनाची तयारी घरात सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच सुप्रियाच्या मृत्यूची बातमी आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.