Ahilyanagar Acid Attack: शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; संगमनेरमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:36 IST2026-03-17T19:25:59+5:302026-03-17T19:36:07+5:30

अहिल्यानगरमध्ये एका शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ahilyanagar Minor Schoolgirl Attacked with Acid While Returning Home in Vadgaon Pan | Ahilyanagar Acid Attack: शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; संगमनेरमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना!

Ahilyanagar Acid Attack: शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; संगमनेरमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना!

Ahilyanagar Acid Attack:अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आता शाळकरी मुलीही असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वडगाव पान परिसरात आज दुपारी शाळा सुटल्यानंतर एक १३ वर्षीय विद्यार्थिनी आपल्या घराच्या दिशेने जात होती. रस्त्याने जात असताना दबा धरून बसलेल्या एका अज्ञात नराधमाने अचानक तिच्या समोर येऊन तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले.

या अनपेक्षित हल्ल्याने मुलगी वेदनेने विव्हळू लागली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मुलीचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक धावत आले, मात्र लोक येण्यापूर्वीच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ॲसिडमुळे मुलीचा चेहरा आणि शरीर गंभीररित्या भाजले असून तिला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. विधानसभा अधिवेशनात आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले. "भरदिवसा चिमुकल्या मुलीवर ॲसिड हल्ला होतो, ही अत्यंत निंदनीय बाब आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया देत पीडित मुलीला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्र्यांचे निर्देश; तपासासाठी चक्रे फिरली

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली असून पोलिसांना तपासाच्या कडक सूचना दिल्या आहेत. "हा ग्रामीण भाग असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे, परंतु आरोपी स्थानिक असण्याची दाट शक्यता आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून आजच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेरमध्ये दहशतीचे वातावरण

महत्त्वाचे म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रणखांब गावात लग्नास नकार दिल्याने एका तरुणीवर हल्ला झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता या चिमुकलीवर झालेल्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संगमनेर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title : स्कूल छात्रा पर एसिड अटैक: संगमनेर में कुछ दिनों में दूसरी घटना

Web Summary : संगमनेर में स्कूल से घर जा रही 13 वर्षीय छात्रा पर एसिड अटैक। गंभीर रूप से घायल, अस्पताल में भर्ती। यह घटना शादी से इनकार करने वाली एक युवती पर हमले के बाद हुई है। पुलिस जांच कर रही है, अधिकारियों ने त्वरित कार्रवाई और पीड़िता को समर्थन का वादा किया है।

Web Title : Acid Attack on Schoolgirl: Sangamner Sees Second Incident in Days

Web Summary : A 13-year-old girl was attacked with acid in Sangamner while walking home from school. Seriously injured, she's hospitalized. This incident follows a similar attack on a young woman rejecting marriage. Police are investigating, and officials promise swift action and support for the victim.