"माझ्यासोबत राहायला नकार दिला म्हणून..."; प्रियकराने संबंध तोडताच प्रेयसीने केले वार, पतीच्या फोनमुळे अडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:34 IST2025-10-15T13:24:10+5:302025-10-15T13:34:48+5:30
अहिल्यानगरमध्ये प्रेयसीकडून प्रियकराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

"माझ्यासोबत राहायला नकार दिला म्हणून..."; प्रियकराने संबंध तोडताच प्रेयसीने केले वार, पतीच्या फोनमुळे अडकली
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये प्रेयसीकडून प्रियकराचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विवाहित असूनही एकमेकांवर प्रेम असल्याने तीन वर्षांपासून प्रियकर आणि प्रेयसी हे सोबत राहत होते. मात्र, प्रियकराने नंतर सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रेयसीने त्याचा खून केला. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे रविवारी ही घटना घडल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी या घटनेचा उलगडा झाला.
भाऊसाहेब विठ्ठल बाचकर असे खून झालेल्या प्रियकराचे तर जयश्री काकासाहेब चव्हाण असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रेयसीचे नाव आहे. रविवारी १२ ऑक्टोबरला मांडवे बु, शिवारात साधारण ३० ते ३५ वर्ष वयाचा पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मयताची ओळख पटविताना हा मृतदेह भाऊसाहेब बाचकर याचा असल्याचे पोलिसांना समजले. अधिक तपासात भाऊसाहेब बाचकर व जयश्री चव्हाण यांच्यात मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे अहिल्यानगर येथे एकत्र राहत असल्याचे समोर आलं.
शनिवारी दुपारी बाचकर हा पत्नी व मुलांना भेटण्यासाठी संगमनेर तालुक्यातील साकुर येथे आला होता. तेव्हा त्याच्यासोबत जयश्री चव्हाण ही देखील होती. 'मला आता जयश्री सोबत राहायचे नाही, यापुढे तुझ्यासोबत राहणार आहे' असे पत्नी योगिता बाचकर हिला सांगितले. वादावादीनंतर भाऊसाहेब बाचकर याला जयश्री चव्हाण मोटारसायकलवर घेऊन गेली. त्यानंतर त्याचा मृतदेह मांडवे येथे आढळून आला.
पोलिसांनी जयश्री चव्हाण हिचा शोध सुरू केला. दरम्यान, तिने तिचा पती काकासाहेब चव्हाण यास फोन करून नेवासा फाटा येथे बोलावले असल्याची माहितीही समोर आली. पोलिसांनी तिला प्रवरासंगम, नेवासा येथून ताब्यात घेतले. भाऊसाहेब बाचकर याने माझेसोबत न राहण्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात टणक हत्यार मारून त्याचा खून केला, अशी कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.