नगरमधील डॉक्टरला ७० लाखाला घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:16+5:302020-12-24T04:19:16+5:30

अहमदनगर : फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून नायजेरियन गुन्हेगारांनी नगर शहरातील एका डॉक्टरला तब्बल ७० लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर ...

70 lakh to a doctor in the city | नगरमधील डॉक्टरला ७० लाखाला घातला गंडा

नगरमधील डॉक्टरला ७० लाखाला घातला गंडा

अहमदनगर : फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून नायजेरियन गुन्हेगारांनी नगर शहरातील एका डॉक्टरला तब्बल ७० लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी या नायजेरियन टोळीतील मुख्य सूत्रधाराला दिल्ली येथून अटक केली आहे. २ सप्टेंबर ते २७ ऑगस्टदरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. इडूय केस्टर ऊर्फ इब्राहीम (वय ३३ मूळ रा. नायजेरिया हल्ली रा. दक्षिण दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील एका डॉक्टरची फेसबुकच्या माध्यमातून अमेलिया स्मिथ या महिलेशी मैत्री झाली. सदर महिलेने ती परदेशी असल्याचे भासविले. परदेशात असलेल्या आमच्या कंपनीला भारतातील हर्बल प्रोडॉक्ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चा माल घ्यावयाचा आहे. यासाठी आपण मध्यस्ती करा, या माध्यमातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील, अशी ऑफर सदर महिलेने या डॉक्टरला दिली. भारतातल्या ज्या कंपनीकडून माल घ्यावयाचा आहे, त्या कंपनीचा संपर्क क्रमांक व वेबसाईटबाबतही त्या महिलेनेच डॉक्टरला माहिती दिली. प्रत्यक्षात आयुर्वेदिक कंपनी, मैत्री करणारी ती महिला हे सर्व नायजेरियन गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी रचलेला कट होता. याच कटामध्ये सदर डॉक्टर अडकला आणि त्याने वेगवेगळ्या सहा बँक खात्यावर ७० लाख रुपये भरले. पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा नायजेरियन टोळीतील प्रमुख सदस्य आहे.

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अंबादास भुसारे, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेडकॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, पूजा भांगरे, प्रशांत राठोड, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. हा नायजेरियन फ्रॉड असून यातील आरोपी हे दिल्ली येथे असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर प्रतीक कोळी यांचे पथक दिल्ली येथे दाखल झाले. आठ दिवस तेथे शोध घेऊन आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली.

अशी केली फसवणूक

अमेलिया स्मिथ ही बनावट महिला डॉक्टरच्या संपर्कात आल्यानंतर तिने त्याला बिझनेस करण्याची ऑफर दिली. यासाठी आम्हीच परदेशातून पैसे पाठवितो, असे आमिष तिने दाखविले. यासाठी डॉक्टरचा बँक अकाऊंट क्रमांक घेतला. या अकाऊंटवर पैसे पाठविले असल्याचे तिने डॉक्टरला सांगितले. याच दरम्यान डॉक्टरला एक फोन आला. रिझर्व्ह बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे त्याने सांगितले. तुमच्या खात्यावर परदेशातून मोठी रक्कम वर्ग झाली आहे. हे पैसे रुपयांमध्ये परावर्तित करण्यासाठी विविध स्वरूपाचे टॅक्स तुम्हाला भरावे लागतील. असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्यक्षात फोन करणारी ती व्यक्ती नायजेरियन टोळीतीलच एक सदस्य होती. थेट रिझर्व्ह बँकेतून फोन आल्याचा समज झाल्याने गुन्हेगार सांगेल त्या खात्यावर या डॉक्टरने पैसे भरले.

फोटो २३ आरोपी

ओळी- डॉक्टरला गंडा घालणाऱ्या नायजेरियन गुन्हेगाराला सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली.

Web Title: 70 lakh to a doctor in the city