शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६३७ कोटी जमा; पिकांच्या नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत, विखेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 15:37 IST2024-02-11T15:33:02+5:302024-02-11T15:37:50+5:30
Radhakrishna Vikhe Patil : मार्च २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात ११ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६३७ कोटी जमा; पिकांच्या नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत, विखेंची माहिती
शिर्डी : जिल्ह्यात २०२२-२०२३ मध्ये झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे दोन लाख ५५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी २९१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. याच दरम्यान अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दोन लाख ९२ हजार ७५० शेतऱ्यांना विशेष बाब म्हणून २४१ कोटी रुपयांची मदत देण्यात आली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मार्च २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात ११ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दहा कोटी ४१ लाख ४७ हजार ५८३ शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत म्हणून ४६ कोटी ९३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिली असून, जिल्ह्यातील २७ हजार ५३० शेतकऱ्यांना १९ कोटी ५५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या वादळी वारे आणि गारपिटीतील पिकांच्या नुकसानीकरिता २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख, जून २०२३ मध्ये वादळी वारे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ४६० शेतकऱ्यांना ४५ लाख आणि सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिके व शेतजमिनीच्या नुकसानीपोटी ९२ शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असल्याकडे लक्ष वेधून, आतापर्यंत नैसर्गिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असून, जिल्ह्याला आतापर्यंत ६३७ कोटी ७८ लाख रुपयांची मदत देण्यात आली.