दीडपट रकमेच्या आमिषाने ४८ लाखांची फसवणूक

By Admin | Updated: April 30, 2017 15:42 IST2017-04-30T15:42:11+5:302017-04-30T15:42:11+5:30

दीडपट परताव्याचे आमिष दाखवून शेवगावमधील सहा जणांना ४८ लाख ६१ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना शेवगावमध्ये उघडकीस आली आहे़

48 lakh cheated by the bribe of half a million | दीडपट रकमेच्या आमिषाने ४८ लाखांची फसवणूक

दीडपट रकमेच्या आमिषाने ४८ लाखांची फसवणूक

आॅनलाइन लोकमत
शेवगाव (अहमदनगर), दि़ ३० - दीडपट परताव्याचे आमिष दाखवून सहा जणांना ४८ लाख ६१ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना शेवगावमध्ये उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे ज्या कंपनीत संबंधित लोकांना रक्कम गुंतविल्याचे सांगण्यात येत होते, ती कंपनीही बनावट असल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत विठ्ठलराव काळे (रा. ब्राह्मणगल्ली, शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीनुसार श्रीराम कॉलनी भागातील एलआयसी विमा प्रतिनिधी असलेला दादासाहेब श्रीधर भुसारी व त्याची पत्नी माया तसेच सचिन श्रीधर भुसारी व त्याची पत्नी पूजा यांनी आपल्या भागीदारीतील डी. एस. भुसारी मल्टीसर्व्हिसेस अँड ट्रेडिंग कंपनी आणि स्वप्नपूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांत पैसे गुंतविल्यास दोन वर्षात दीडपट रक्कम मिळण्याचे आमिष परिसरातील लोकांना दाखवून १३ लाख १५ रुपये उकळले़ नोव्हेंबर २०१४ ते जून २०१६ या कालावधीत डी. एस. भुसारी मल्टिसर्व्हिसेस अँड ट्रेडिंग या कंपनीत एकूण ११ लाख रुपये, तसेच स्वप्नपूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत एकूण २ लाख १५ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले़ या रकमा स्वीकारल्यापोटी संबंधितांना पोहोच पावत्याही देण्यात आल्या. यातील काही रकमांची दीड वर्षाची मुदत पूर्ण झाल्यामुळे दादासाहेब भुसारी व त्याचा भाऊ सचिन भुसारी यांच्याकडे काळे यांनी पैशाचा तगादा लावला. वेळोवेळी पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने काळे यांनी व्यवहाराबाबत अधिक चौकशी केली असता यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, त्यानंतर श्रीकांत काळे यांनी दादासाहेब श्रीधर भुसारी व त्यांची पत्नी माया तसेच सचिन श्रीधर भुसारी व त्यांची पत्नी पूजा यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला.
आरोपींनी शेवगाव येथील राजेंद्र चंपालाल मेहेर (४ लाख), शिवाजी गहिनीनाथ बडे (१४ लाख २० हजार), सुचेत गोकुळ भालसिंग (४ लाख ४६ हजार) व सामनगाव (ता.शेवगाव) येथील विनोद एकनाथ शेळके यांच्याकडून ९ लाख २५ हजार रुपये घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले़ या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांचे जबाब घेऊन सहाजणांची एकूण ४८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल भुसारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: 48 lakh cheated by the bribe of half a million