पारनेर येथे १०० तासांचा अखंड ‘स्वर’यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:45+5:302021-08-19T04:25:45+5:30
अहमदनगर : पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू महाराज पारनेरकर यांच्या मातोश्री मनकर्णिका रामचंद्र पारनेरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पूर्णवाद परिवार व ...

पारनेर येथे १०० तासांचा अखंड ‘स्वर’यज्ञ
अहमदनगर : पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू महाराज पारनेरकर यांच्या मातोश्री मनकर्णिका रामचंद्र पारनेरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पूर्णवाद परिवार व ओम पूर्णवाद संगीत कला अकादमीतर्फे पारनेर येथे शंभर तासांचा स्वरयज्ञ आयोजित करण्यात आला आहे. हा स्वरयज्ञ २० ते २४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
ओम पूर्णवाद संगीत कला अकादमीच्या संस्थापिका-अध्यक्षा संगीता पारनेरकर यांनी ही माहिती दिली. पारनेर येथील डॉ. रामचंद्र महाराज यांनी पूर्णवाद परिवाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पत्नी व सध्याचे पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू महाराज यांच्या मनकर्णिका या मातोश्री होत. त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. पारनेर (जि. अहमदनगर) येथील पूर्णवाद भवन परिसरातील मंदिरात शुक्रवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता या स्वरयज्ञाचा प्रारंभ होणार आहे, तर २४ ऑगस्टला दुपारी तीन वाजता याची सांगता होणार आहे.
-----------------
या स्वरयज्ञात आरती, अभंग, भावगीत, भक्तिगीत गायन सादर करायचे आहे. गायकांना या स्वरयज्ञात सेवा म्हणून सहभागी व्हायचे आहे. ‘मला गाता येत नाही’ किंवा ‘माझा आवाज चांगला नाही’ असे म्हणणाऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यांनाही एखादी आरती गायन करून सहभाग घेता येणार आहे.
स्वरयज्ञाचे नियोजन करणे सोयीचे व्हावे, यासाठी नोंदणी आवश्यक राहणार आहे. यासाठी पारनेर येथे वैष्णवी मुळे, गुरुवाडा, पारनेर, जि. अहमदनगर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
कलाकारांच्या मनातही सेवाभाव जागृत व्हावा, यासाठी स्वरयज्ञ हा उपक्रम पारनेर येथील मनकर्णिका माता मंदिरात होणार आहे. या यज्ञात स्वरांची आहुती दिल्यानंतरचा अनुभव समाधान मिळवून देणारा आहे. एखाद्या सभागृहाऐवजी मंदिरात हा स्वरयज्ञ करण्यामागे सेवाभाव जागृत करणे हाच उद्देश आहे.
- संगीता पारनेरकर, आयोजक