संत सावता माळी : कर्मयोगी संत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:13 PM2019-07-31T14:13:53+5:302019-07-31T14:14:39+5:30

कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय.

Sant Sawat gardener: Karmayogi saint | संत सावता माळी : कर्मयोगी संत

संत सावता माळी : कर्मयोगी संत

googlenewsNext

कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. 
अवघिया पुरते वोसंडले पात्र।
अधिकार सर्वत्र वाहे येथे।

अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर संत ज्ञानदेव, नामदेवांच्या  भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचे कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचे होते, तरी देखील त्यांच्या तत्त्वनिरूपणात आणि भक्तीपर वाङ्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे. किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळेच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभली आहे. ज्यांना सामाजिक जीवनातील जडत्त्व व अप्प्रवृत्ती नष्ट करून त्याला नवे वळण देण्याची आवश्यकता वाटली, त्यांनी आपल्या सर्व सिद्धीसाठी धार्मिक प्रबोधनाची कास धरली.

उदरनिर्वाहासाठी दिवसभर काबाडकष्ट करीत राहण्यापलीकडे ज्यांच्या जीवनाला काही अर्थ नव्हता, अशा सर्वसामान्य लोकांत मराठी संतांनी उच्चतर जीवनाची आकांक्षा निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक व नैतिक उन्नतीचा मार्ग खुला झाला. समग्र जीवन उजळून टाकणाºया विशुद्ध धर्मभावनेचे स्वरूप त्यांनी सर्व थरातील लोकांना निरूपण कीर्तनाद्वारे विशद करून सांगितले. त्यात एकांगीपणा कुठेही नव्हता. ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई, चोखामेळा इत्यादी संतांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि नीती यांची सुरेख सांगड घातली. अंधश्रद्धा, कर्मठपणा, क्षुद्रदेवता भक्ती, दांभिकता व बाह्य अवडंबर यावर त्यांनी कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता नि:शंकपणे कोरडे ओढले. त्याचबरोबर अंत:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचरण, निर्भयता, नीतिमत्ता, आत्मोपम्य भाव, सहिष्णुता इत्यादी गुणांचा त्यांनी जागर केला. जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवताना वारकरी संतांनी दोन गोष्टींचे आवर्जून भान राखले. ईश्वर प्राप्तीसाठी योगयाग, जपतप, तीर्थव्रत यांसारख्या साधनांची बिल्कूल आवश्यकता नाही.
योग याग तप धर्म
सोपे वर्म नाम घेता
तीर्थव्रत दान अष्टांग
यांचा पांग आम्हा नको

संत सावता माळी यांचे विचार अर्थपूर्ण आहेत. पोटापाण्याचा व्यवसाय हा प्रत्येकालाच करावा लागतो. तसे पाहिले तर हे संत उत्तम कारागीर होते. स्वत:चा व्यवसाय सांभाळून त्यांनी परमात्मा उपासना चालू ठेवली होती. 

सावता माळी हे मराठी संत मंडळातील एक ज्येष्ठ संत. अरण भेंड हे त्यांचे गाव पंढरपूरहून जवळ असले तरी ते आडबाजूलाच आहे. अशा दूरगावी राहून सुद्धा त्यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. सावता महाराजांची निश्चित जन्मतिथी व जन्मवेळ मिळत नाही. मात्र अरण गावी ११७२ (इ.स. १२५०) मध्ये नांगिताबाई यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. नामदेव महाराजांनी सावतोबांच्या जन्माविषयी पुढील अभंग रचला आहे. 
धन्य ते अरण, रत्नाचीच खाण
जन्माला निधान, सावता तो
सावता सागर प्रेमाचसे आगर
घेतला अवतार माळ्या घरी

अशा थोर पुण्यात्म्याचा शेवटही तितकाच गोड आहे. प्रात:काळी स्नान करुन त्यांनी दैनंदिन यथाविधी के ली. आणि आपला देह अनंतात विलीन केला, असं म्हटले जाते. 

दीपस्तंभ एकाच जागी स्थिर  राहून अंधाºया रात्री लोकांना अचूक मार्गदर्शन करतो. धैर्याने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन देतो. एकाच जागी स्थिर राहून विठ्ठल भक्तीचा दीप त्यांनी उजळला. त्या सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी कर्तृत्व याची उज्ज्वल यशोगाथा ही तुमची आमची लाख मोलाची ठेव ठरली. 
- धोंडीराम सातव
(लेखक केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहेत.)

Web Title: Sant Sawat gardener: Karmayogi saint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.