मन:शक्ती मजबूत झाल्यास अनेक बदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 06:38 AM2019-04-29T06:38:06+5:302019-04-29T06:39:07+5:30

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे.

If the power of the mind strengthens, many changes can be possible | मन:शक्ती मजबूत झाल्यास अनेक बदल शक्य

मन:शक्ती मजबूत झाल्यास अनेक बदल शक्य

Next

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे. मनावरच ध्यान, योग, आसन, प्राणायाम व नंतर योगाची प्राप्ती अवलंबून आहे. कारण मनानुसार भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक स्तरावरची प्रक्रिया ठरत असते. मनाची एक शक्ती आपल्या आतल्या-बाहेरच्या क्रिया करायला भाग पाडते. आपल्या श्वासोच्छ्वासावरही त्याचा परिणाम होतो. मनाला विश्रांती किंवा शिस्तबद्धपणा लावावयाचा असेल तर भावनेवर नियंत्रण ठेवता यावे. जर भावनेवर नियंत्रण ठेवता आले नाही तर आपल्या हातून काहीही कृत्य घडू शकते. शरीरातील पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्थेवरही त्याचा परिणाम होत असतो. मन वेगवेगळ्या स्थितीला जाऊन पोहोचते. तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होत असतोच! म्हणून आपण आपल्या शरीरावर व मनावर नियंत्रण आणू इच्छित असाल तर आध्यात्मिक मार्गाने जाणे सोयीचे ठरेल. आध्यात्मिक मार्गाने गेल्यास आपल्या आपण मनाला सुदृढ करू शकतो. आपल्यातला न्यूनगंड कमी करू शकतो. आत्मविश्वासाला बळकटी आणता येते. विश्वचैतन्याच्या लहरींशी एकत्र होता येते. मग आत्मस्फूर्ती निर्माण होते. हळूहळू क्रियात्मक बदल घडू लागतात. वेगवेगळ्या स्थितीमध्ये शरीरात व मनात परिवर्तन होते. त्याच्या प्रत्येक कृतीत लय व चैतन्य असते. त्यामुळे जीवनात सतर्कता येते, एक नवीन दृष्टी मिळते. चैतन्याकडे लक्ष केंद्रित होते. यासाठीच मनावर नियंत्रण मिळवले पाहिजे. कारण त्यामुळे स्वास्थपूर्ण जीवन जगता येते. मानसिक आरोग्य स्थिर राहाते. जीवनशैली बदलते. तुमचे जीवन सुखी व आनंदी राहाते. रोगप्रतिकारक शक्ती मनावरच अवलंबून असते. मन:शक्ती मजबूत असली की स्वत:मध्ये अनेक बदल घडवू शकतो. मनातील वाईट विचारांचा नाश करून मनाला चांगल्या विचारांची सवय लागते. त्यामुळे माणसांनी अध्यात्माचा आश्रय घ्यावा. अध्यात्माशिवाय आत्मिक उन्नती नाही. आत्मिक उन्नतीशिवाय जीवन सुखी बनू शकत नाही. त्यामुळे अध्यात्माशी एकरूप होऊन मनावर नियंत्रण मिळवा व सुखी संसाराचा मार्ग अवलंबावा.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

Web Title: If the power of the mind strengthens, many changes can be possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.