गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 02:15 PM2024-06-14T14:15:57+5:302024-06-14T14:28:56+5:30

गुरुचे नक्षत्र गोचर शुभ मानले जात आहे. याचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात नवग्रह जसे राशीपरिवर्तन करतात, तसेच नियमित कालांतराने नक्षत्र परिवर्तन करत असतात. राशींप्रमाणे नवग्रहांना नक्षत्रांचे स्वामित्वही बहाल केलेले आहे. नक्षत्र समुहातून रास तयार होत असते. त्यामुळे एखाद्या ग्रहाच्या नक्षत्र गोचराचा सर्व राशींवर तसेच देश-दुनियेवर प्रभाव पडत असतो, असे सांगितले जाते. गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान असून, आता गुरु ग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे.

वृषभ रास आणि रोहिणी नक्षत्र या दोन्हींचे स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे. विशेष म्हणजे आताच्या घडीला शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत आहे. या राशीत गुरु आणि शुक्र युती योगात आहेत. १३ जून रोजी गुरु ग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. तर रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे आवडते नक्षत्र असल्याची मान्यता प्रचलित आहे.

सुख-समृद्धी, मान-सन्मान यांचा कारक असलेला गुरु ग्रह रोहिणी नक्षत्रात विराजमान होणे अनेकार्थाने शुभ मानले जात असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, कुटुंब या आघाड्यांवर गुरुच्या नक्षत्र गोचराचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घेऊया...

मेष: गुरुचा नक्षत्र बदल सकारात्मक ठरू शकतो. समृद्धी आणि प्रगतीची नवीन दारे खुली होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. संपत्ती वाढू शकेल. नवीन घर घेण्याचा विचार करू शकता. नवीन विषयांबद्दल जाणून घेण्यात रस असेल. जमीन आणि मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे.

वृषभ: करिअरमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. लहान भावंडांशी संबंध सुधारू शकतील. आनंददायी घटना घडू शकतील. कुटुंबासोबत वेळ घालवतील. स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढू शकेल. अभ्यासात चांगली कामगिरी करू शकाल. स्वत: काहीतरी नवीन शिकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

मिथुन: आर्थिक स्थिती सुधारू शकेल. आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. वाणी, संवाद आणि लेखन अधिक प्रवाही होऊ शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ फल देणारे मानले जात आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक आत्मविश्वास आणि स्वावलंबी बनण्यास मदत होऊ शकेल.

कर्क: गुरुचा नक्षत्र बदल नवीन उत्साह, आत्मविश्वास आणि वैयक्तिक विकासात वाढ करू शकेल. स्वतःची ओळख निर्माण करू शकाल. ही वेळ स्वतःची काळजी घेण्याची आहे. जीवनशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलात तर ते हिताचे ठरू शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे.

सिंह: गुरुचा नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी बदल दिसू शकतो. बदली होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, सकारात्मक काळ आहे. भविष्यात नफा मिळू शकतो. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशात राहून तिथे स्वतःचे घर असावे असे स्वप्न पाहत आहेत, गुरुकृपेने हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. संवाद कौशल्याच्या मदतीने लाभ मिळवू शकता.

कन्या: गुरु नक्षत्र बदलामुळे विशेष लाभ मिळू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. अनेक बाबतीत फायदा होऊ शकतो. व्यवसायातही फायदा होऊ शकेल. काही कामाच्या वेळी धावपळ करावी लागू शकेल. परंतु, त्याला लाभ होऊ शकेल. अध्यात्माकडे कल राहील. तीर्थयात्रेला जाता येऊ शकेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

तूळ: गुरुचा नक्षत्र बदलाचा लाभ होऊ शकेल. अनेकविध क्षेत्रात यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होऊ शकतील. आर्थिक स्थिती चांगली असू शकते. कामाच्या ठिकाणीही कामाचे कौतुक होईल. करिअर वाढ, पदोन्नती आणि व्यवसायात प्रगती होऊ शकेल.

वृश्चिक: जीवनात विकासाच्या नवीन संधी मिळतील. उच्च शिक्षणासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. करिअरमध्ये तुम्हाला शुभ संधी मिळतील. अध्यात्माकडे कल वाढेल. प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर यश मिळू शकेल. संपत्ती वाढू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.

धनु: आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याची संधी मिळू शकेल. दीर्घकालीन बचत करू शकाल. अनपेक्षित फायदे मिळवू शकाल. हा काळ आयुष्यात मोठे यश मिळवून देणारा मानला जात आहे. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. कुटुंबातील सदस्यांसह जीवनात समृद्धी येईल.

मकर: गुरूचे नक्षत्र गोचर मोठे बदल घडवून आणेल, असे मानले जात आहे. नातेसंबंध सुधारण्यात किंवा नवीन, सखोल आणि चिरस्थायी संबंध निर्माण करण्यात मदत करू शकते. मित्रांसोबत संबंध सुधारतील. लोकांशी संघर्ष किंवा स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न करा. हुशारीने वागा.

कुंभ: खाण्याच्या सवयी बदलण्यासाठी, व्यायाम सुरू करण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा. सहकारी आणि वरिष्ठांशी चांगले जुळवून घेण्यास मदत होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहू शकेल.

मीन: जीवनात शुभ प्रभाव वाढू शकतो. सर्जनशील क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. सर्जनशील कार्यात यश मिळेल. कुटुंबात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील उत्कटता पुन्हा जागृत करण्यास मदत होऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.