Holi Special : जाणून घ्या होळी दहनाचा शुभ मुहूर्त आणि होळीचं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:12 IST2019-03-19T12:11:14+5:302019-03-19T12:12:08+5:30
Holi special: प्रत्येक सण हा आपला असा वेगळा रंग घेऊन येत असतो. मात्र रंगपंचमी, होळी हे सण असे असतात जेव्हा खऱ्या अर्थाने रंगाची उधळण होत असते.

Holi Special : जाणून घ्या होळी दहनाचा शुभ मुहूर्त आणि होळीचं महत्त्व!
(Image Credit : Patrika)
होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची ठिकाणांनुसार विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
महत्त्व/आख्यायिका
लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.
होळी पूजेचे महत्व
घरात सुख – शांती, समृद्धि, संतान प्राप्ती यासारख्या अनेक गोष्टींसाठी महिला या दिवशी होळीची पूजा करतात. होळीच्या एक महिना अगोदर सर्व तयारी सुरू असते. अनेक सुकलेल्या झाडांची फांदी जमा केली जाते. आणि होळीच्या दिवशी त्यांना एकत्र करून पूजा करून पेटवले जाते.
होळी दहनाचा मुहूर्त
शुभ मुहूर्त सुरू - रात्री ०८:५८ पासून
शुभ मुहूर्त समाप्त - रात्री ११:३४ पर्यंत