कल्याण मेट्रोची वाट बिकट, हजारो लोक विस्थापित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:25 AM2017-10-27T03:25:22+5:302017-10-27T03:26:26+5:30

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला

The Kalyan metro passage is difficult, thousands of people are at risk of being displaced | कल्याण मेट्रोची वाट बिकट, हजारो लोक विस्थापित होण्याचा धोका

कल्याण मेट्रोची वाट बिकट, हजारो लोक विस्थापित होण्याचा धोका

googlenewsNext

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएने मेट्रोचा मार्ग ठरवताना या बाबींचा विचार कसा केला नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला असून या मार्गासाठी जर रस्ता रूंद करायचा ठरवला, तर शहराच्या मध्यवर्ती भागातील शेकडो कुटुंबे विस्थापित होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
दुर्गाडी, सहजानंद चौक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही कल्याणमधील मेट्रोची प्रमुख स्थानके आहेत. दुर्गाडी ते बाजार समितीच्या रस्त्यावर सहा फूटही जागा शिल्लक नाही. तेथील रस्ते आधीच अरुंद आहेत. तेथून मेट्रो कशी नेणार, त्याचा मार्ग कसा बांधणार, त्यांच्या स्टेशनसाठी जागा कशी निर्माण करणार असे अनेक प्रश्न माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि सिटीझन फोरमचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केले आहेत. काहीही नियोजन नसताना हा प्रकल्प हाती घेतला आहे. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पण प्रकल्पासाठी जागा कशी व कुठून आणणार, असा मुद्दा त्यांनी मांडला. सध्याच्याच मार्गावरून मेट्रो रेल्वे न्यायची ठरवल्यास दुर्गाडी ते बाजार समितीदरम्यान हजारो लोक विस्थापित होण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मेट्रोच्या स्टेशनला जागा देण्यास बाजार समितीचा, शेतक-यांचा असलेला विरोध पाहता दुर्गाडी ते बाजार समितीदरम्यान या मेट्रोमार्गासाठी सहा फूटही जागा शिल्लक नाही. सहजानंद चौकात स्टेशन कसे उभारणार, असा प्रश्न घाणेकर यांनी विचारला.
दुर्गाडी ते पत्री पुलादरम्यान होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास रस्ता तयार केला. या रस्त्याचे नियोजन व प्रयोजन फसले. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटण्याचा हेतू विफल झाला आहे. दुर्गाडी ते बाजार समितीचा पट्टा आणि पुढे पत्री पुलापर्यंतच्या रस्त्यावर दुर्गाडी ते शिवाजी चौकदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आणि इमारती आहेत. हे रस्ते अरुंद आहेत. तेथे सतत वाहतूक कोंडी होते. त्यातच त्या रस्त्यांवर मेट्रोसाठी मार्ग टाकण्याचे काम हाती घेतल्यावर वाहतुकीचे नियोजनच कोलमडेल. याच रस्त्यात मेट्रोचे खांब उभारले तर वाहने जाण्यासाठी पुरेसा रस्ताच शिल्लक राहणार नाही. मेट्रोचा मूळचा मार्ग हा खडकपाडामार्गे होता. तो दुर्गाडी, सहजानंद चौक आणि बाजार समिती असा वळवण्यात आला.
खडकपाडा मार्ग रद्द करण्यात आला. हा बदल कोणी केला, कशासाठी आणि कोणाच्या हितासाठी केला, याविषयी त्यांनी संशय व्यक्त केला. दुर्गाडी ते बाजार समितीपर्यंत मेट्रोचा प्रकल्प रेटून नेला, तर पुन्हा एकदा हजारो जणांवर विस्थापित होण्याची वेळ येईल, अशी भीती घाणेकर यांनी व्यक्त केली.
>बाजार समितीतही खळबळ, शेतकरी नाराज
मेट्रोच्या कारशेडसाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिसमध्ये जागा तयार करण्याऐवजी राज्यातील दुसºया क्रमांकाच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरूवारी शेतकरी, व्यापाºयांत एकच खळबळ उडाली. भाजपा-शिवसेनेचे हे सरकार शेतकºयांच्या मूळावर उठल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी दिली. बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी मात्र खूपच सावध भूमिका घेतली. ही जागा बाजार समितीसाठी आरक्षित आहे. ती शेतकरी आणि विक्रेते यांच्यासाठी आहे. यापूर्वी गोविंदवाडी बायपाससाठी १५ गुंठे जागा घेतली आहे. पुन्हा स्टेशन उभारण्यासाठी जागा घेतली जाणार असेल, तर त्याला विरोध असेल, अशी भूमिका सभापती रवींद्र घोडविंदे यांनी मांडली.
शेतकरी, शेतमाल विक्रेते यांच्यासाठी असलेली जागा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला देणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या स्थानकासाठी अन्यत्र जागा घ्यावी. कल्याण रेल्वे स्थानकानजीक मेट्रोचे स्टेशन उभारण्यास बाजार समितीची हरकत नाही. पण बाजार समितीची एक इंचही जागा मेट्रो रेल्वेसाठी दिली जाणार नाही. बाजार समितीचे सर्व प्रकल्प नियोजित आहेत. त्यांचा आराखडा मंजूर आहे. फूल मार्केटचे काम महापालिकेने मंजूर केले आहे. त्याचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच केला जाणार आहे. त्यावेळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. मेट्रोसारखा विकास प्रकल्प उभारण्यास आमचा विरोध नाही. पण त्या प्रकल्पासाठी आमची जागा घेऊ करु नका, अशी बाजार समितीतर्फे आमची भूमिका आहे. तिचा विचार सरकारने केला पाहिजे, असा मुद्दा घोडविंदे यांनी मांडला.

Web Title: The Kalyan metro passage is difficult, thousands of people are at risk of being displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.