कणकवली पंचायत समिती सभापतीपदी सुजाता हळदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:54 AM2018-11-06T11:54:04+5:302018-11-06T11:54:56+5:30

कणकवली पंचायत समितीच्या सभापतीपदी फोंडाघाट प्रभागातून निवडून आलेल्या सुजाता हळदिवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

Sujata Haldivade for Chairman of Kankavli Panchayat Samiti | कणकवली पंचायत समिती सभापतीपदी सुजाता हळदिवे

कणकवली पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर सुजाता हळदिवे यांचे पुष्पगुच्छ देवून सुरेश सावंत यानी अभिनंदन केले. यावेळी दिलीप तळेकर, संजय आग्रे, बबन हळदिवे, मनोज रावराणे, मंगेश सावंत, संतोष आग्रे आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली पंचायत समिती सभापतीपदी सुजाता हळदिवेसुचिता दळवी यांची अनुपस्थिती!

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सभापतीपदी फोंडाघाट प्रभागातून निवडून आलेल्या सुजाता हळदिवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

कणकवली पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून त्या जागी सुजाता हळदिवे यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वच्या सर्व म्हणजे 16 सदस्य आहेत. पक्ष नेतृत्वाकडून सभापतीपदासाठी सुजाता हळदिवे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. त्यामुळे त्यानी सभापती पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज  दाखल केला होता. 

कणकवली पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा भाग्यलक्ष्मी साटम यांनी पक्षादेशा प्रमाणे दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी सोमवारी सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्व सदस्य सकाळी 11 वाजता कणकवलीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संपर्क कार्यालयात एकत्र आल्यानंतर तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी वरिष्ठांकडून सभापतीपदासाठी सुजाता हळदिवे यांचे नाव आल्याचे जाहीर केले.

त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात जावून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय पावसकर यांच्याकडे सुजाता हळदिवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी 3 वाजल्या नंतर निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सभापतीपदासाठी एकमेव अर्ज असल्याने तहसीलदार संजय पावसकर यांनी सुजाता हळदिवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, निवडणूक नायब तहसीलदार एस.एस. कडुलकर उपस्थित होते.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर सुजाता हळदिवे यांचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. मावळते सभापती दिलीप तळेकर, जिल्हापरिषद सदस्य संजय आग्रे, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, मंगेश सावंत, गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री, प्रकाश पारकर, सुभाष सावंत, दिव्या पेडणेकर, हर्षदा वाळके, माजी उपसभापती बबन हळदिवे, फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे, विभागीय अध्यक्ष राजेश रावराणे, भालचंद्र राणे, स्वाभिमानच्या महिला तालुकाध्यक्ष स्वाती राणे, संजीवनी पवार आदी यावेळी उपस्थित होते.

सुचिता दळवी यांची अनुपस्थिती!

कळसुली पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेल्या सुचिता दळवी सभापतीपदासाठी इच्छूक होत्या. सर्वसाधारण प्रभागातून निवडून आलेल्या असल्याने पक्षाकडून त्यांना संधी मिळेल असे त्याना अपेक्षीत होते. मात्र पक्षाकडून त्यांचे नाव न आल्याने स्वाभिमानच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्या सभापती निवडीसाठी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबत पंचायत समिती कार्यालय परिसरात चर्चा सुरू होती.
 

Web Title: Sujata Haldivade for Chairman of Kankavli Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.