छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर परिसर शंभुभक्तांच्या गर्दीने फुलला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:15 PM2024-04-08T18:15:38+5:302024-04-08T18:16:27+5:30

शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते

On the occasion of the 335th death anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj, Tulapur area was filled with a crowd of Shambhu devotees. | छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर परिसर शंभुभक्तांच्या गर्दीने फुलला

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर परिसर शंभुभक्तांच्या गर्दीने फुलला

कोरेगाव भीमा : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे भगवे झेंडे, दिंड्या, पताकांसमवेत शंभुराजांच्या जयघोषात ज्योती घेऊन येणा-या शंभुभक्तांच्या गर्दीने आज संपुर्ण तुळापूर परिसर फुलून गेला होता. शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३५ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त छत्रपती शंभुराजांना पुजाअभिषेक, पोवाडे, व्याख्याने, पालखी मिरवणूक, साहसी मदार्नी खेळ, तसेच रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम झाले.  
    
सकाळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुजाभिषेक करण्यात आला. तसेच व साखळदंडाचेही पुजन करण्यात आले. यावेळी हभप गणेश महाराज फरतळे यांचे व्याख्यानही झाले. त्यानंतर ११ वाजता पोलिस दलाच्या वतीने शंभुराजांना शासकीय सलामीही देण्यात आली. दरम्यान मदार्नी खेळ व लातूर येथील शाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रमही संपन्न झाला. तर दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर येथील कु.साईक्षा दिग्विजय पाटील व पुणे येथील सौ. गितांजली झेंडे यांचे शिवव्याख्यान झाले.  


      
दरम्यान शंभुराजांना अभिवादन करण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही तुळापूरला भेट देत पुष्पहार अर्पण केला. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अ‍ॅड अशोक पवार, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील, यांच्यासह शंभू भक्तांनी तुळापूरला भेट देत शंभुराजांना अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव...छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांसह भगवे झेंडे हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिवसभर ओसंडून वाहत होता.

Web Title: On the occasion of the 335th death anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj, Tulapur area was filled with a crowd of Shambhu devotees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.