पवना धरणात २२ टक्के पाणीसाठा, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी-बाणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 02:19 PM2023-06-10T14:19:08+5:302023-06-10T14:20:09+5:30

पावसाने हुलकावणी दिल्यास शहरात पाणी कपात करावी लागणार आहे...

22 percent water storage in Pavana dam, 'water emergency' in Pimpri-Chinchwad if rain does not come soon | पवना धरणात २२ टक्के पाणीसाठा, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी-बाणी'

पवना धरणात २२ टक्के पाणीसाठा, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी-बाणी'

googlenewsNext

पिंपरी : मावळ तालुक्यातील पवना धरणात अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच ४० दिवस पुरणार आहे. मात्र, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास शहरात पाणी कपात करावी लागणार आहे.

महापालिका पवना धरणातून पाणी उचलून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करते. पवना नदीवरील रावेत बंधारा येथून पाणी उचलून सध्या शहराला दररोज ५१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. कडक उन्हामुळे पवना धरणात सध्या २२ टक्के इतका पाणी साठा उरला आहे. हा साठा जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतका आहे, असे असतानाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. येत्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी न लावता तो लांबल्यास हा पाणी साठा कमी पडणार आहे. तर यंदा सुरुवातीलाच पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने भीती व्यक्त केली जात आहे. ७ जूनला पाऊस राज्यामध्ये दाखल होत असतो. मात्र यावर्षी ८ जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढे प्रवासासाठी त्याला अनुकूल परिस्थिती नसल्यास पाऊस आणखी लांबण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका, मावळातील काही नगरपालिका व एमआयडीसीवर पाणी कपातीची वेळ येऊ शकते.

पवना धरणात सध्या केवळ २२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतके आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास जुलै महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

- समीर मोरे, उपअभियंता, पवना धरण

Web Title: 22 percent water storage in Pavana dam, 'water emergency' in Pimpri-Chinchwad if rain does not come soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.