कन्याकुमारी, तीन सागरांचा संगम होणारे भारताचे दक्षिण टोक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:12 PM2018-12-03T14:12:54+5:302018-12-03T14:47:23+5:30

भारताच्या दक्षिणेकडे असलेले कन्याकुमारी हे शहर आपल्या भौगौलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. भारताचे दक्षिण टोक मानल्या जाणाऱ्या कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर बंगलाचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर अशा तीन सागरांचा संगम होतो. तसेच येथील सूर्योदय आणि सूर्यास्तही प्रेक्षणीय असतो.

तिरुवल्लूर मूर्ती - कन्याकुमारीजवळील एका छोट्याशा बेटावर असलेल्या तिरुवल्लूर मूर्तीची गणना भारतातील सर्वात मोठ्या मूर्तींमध्ये होते. ही मूर्ती 133 फूट ऊंच आहे.

पद्मनाभपूरम महाल - कन्याकुमारीमधील पद्मनाभपूरम महाल आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. राजा त्रावणकोर यांनी या महालाची निर्मिती केली होती.

कोर्टलम झरा - कन्याकुमारी येथील कोर्टलम झरा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. 167 मीटर ऊंचावरून वाहणाऱ्या या झऱ्याखाली स्नान केल्याने अनेक आजार दूर होतात, असे सांगितले जाते.

विवेकानंद रॉक मेमोरियल - विवेकानंद रॉक मेमोरियल हे कन्याकुमारी येथील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती. तसेच कन्या कुमारी यांनीही येथे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते.

भगवती अम्मन मंदिर - कन्याकुमारी येथील भगवती अम्मन मंदिर हे तीन हजार वर्षे जुने आहे. भगवान परशूराम यांनी बांधलेले हे पहिले दुर्गा मंदिर असल्याची आख्यायिका आहे.

गांधी मेमोरिअल - कन्याकुमारी येथील गांधी मेमोरिअल येथे महात्मा गांधींचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे.

नागराज मंदिर - नागराज मंदिरावरील कलाकुसर ही चिनी बौद्ध विहारावरील कलाकुसरीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे जेव्हा कन्याकुमारीला जाल तेव्हा या मंदिराला अवश्य भेट द्या.

अवर लेडी ऑफ रॅनसम चर्च - अवर लेडी ऑफ रॅनसम चर्च हे मदर मेरीच्या स्मरणार्थ पंधराव्या शतकात बांधण्यात आले होते.

त्सुनामी स्मारक - 2004 साली आलेल्या त्सुनामीमध्ये भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर विध्वंस घडवला होता. या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांची आठवण म्हणून त्सुनामी स्मारक बनवण्यात आले आहे.

उदयगिरी किल्ला - उदयगिरी किल्ला हा कन्याकुमारीपासून 34 किमी अंतरावर आहे. हा किल्ला राजा मार्तंड वर्मा याने बांधला होता.