Android Tips: सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय

By सिद्धेश जाधव | Published: December 15, 2021 06:43 PM2021-12-15T18:43:44+5:302021-12-15T18:57:14+5:30

Android Tips: सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांमध्ये जितका दोष गुन्हेगाराचा असतो तितकाच आपलाही असतो हे आपण विसरतो. अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँड्रॉइड फोन्सना लक्ष्य केले जाते. आज आपण अँड्रॉइड युजर्स कशाप्रकारे अशा फसवणुकीपासून वाचू शकतात, हे पाहणार आहोत.

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्ही काय डाउनलोड करता आणि कोणत्या अ‍ॅप्सना अ‍ॅक्सेस देता हे पाहणं महत्वाचं आहे. पुढे आम्ही काही अँड्रॉइड युजर्सच्या अशा चुका सांगितल्या आहेत, ज्यांच्यामुळे स्कॅमर्सचं काम आणखीन सोपं होतं.

अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्या अ‍ॅपच्या अटी आणि शर्थी वाचून घ्याव्या. तसेच अ‍ॅप्लिकेशनला कोणत्या परवानग्या लागणार आहेत याची माहिती घ्यावी. काही अ‍ॅप्स गरज नसताना देखील खाजगी डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागतात. तसेच अ‍ॅप्सचे रिव्युज देखील त्यांच्याबद्दल बरीच माहिती देऊ शकतात.

ब्लॉटवेयर म्हणजे असे अ‍ॅप्स जे तुमच्या नव्या स्मार्टफोनवर आधीपासून असतात, परंतु ते अनइन्स्टॉल केले तरी फोनवर काही परिणाम होत नाही. हे अ‍ॅप्स जागा तर घेतात तसेच जाहिराती दाखवून तुमचा डेटा देखील चोरू शकतात. त्यामुळे नवीन अँड्रॉइड फोन घेतल्यावर अशा अ‍ॅप्सना केराची टोपली दाखवावी.

कितीही लोकप्रिय अ‍ॅप्स असले तरी त्यांची एपिके फाईल इन्स्टॉल करू नये. तुम्हाला हवे असेलेले अ‍ॅप्स नेहमी गुगल प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करावेत. जे अ‍ॅप्स प्ले स्टोरवर उपलब्ध नाहीत असे अ‍ॅप्स इन्स्टॉल करणं म्हणजे एक प्रकारची रिस्क घेणं आहे.

सध्या फोन चोरणारे फक्त फोन विकण्यासाठी चोरत नाहीत, तर तुमचा डेटा देखील ते विकू शकतात. त्यामुळे फोनला लॉक करणं आणि Google ची find device service ऑन करणं खूप महत्वाचं आहे.

थर्ड पार्टी अ‍ॅप्सना अ‍ॅप इन्स्टॉल करण्याची परवानगी देऊ नये. हे अ‍ॅप्स तुमच्या नकळत फोनवर अ‍ॅप इन्स्टॉल करू शकतात. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ही परवानगी रद्द करावी.

काही धोकादायक अ‍ॅप्स समोर दिसत नाहीत कारण त्यांचे आयकॉन्स लपलेले असतात. परंतु अँड्रॉइडच्या सेटिंगपासून कोणी लपत नाही. सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजमेंटमधील यादी बघा आणि जे अ‍ॅप्स तुम्ही स्वतःहून इन्स्टॉल केले नाहीत ते उडवून टाका.

तुमच्या गुगल अकॉउंटचा पासवर्ड वेळोवेळी बदला. दुसऱ्या वेबसाईटवर वापरलेला पासवर्ड गुगल अकॉउंटसाठी वापरणं टाळा.

अँड्रॉइड फोन्सच्या सुरक्षेसाठी जे अ‍ॅप्स तुम्ही वापरत नाही ते अनइन्स्टॉल करणं केव्हाही चांगलं. असे अ‍ॅप्स फक्त मेमरी खात नाहीत तर मालवेयर देखील आकर्षित करू शकतात.

Read in English