पार्टनरसोबत तुमचेही रोज वाद होतात का?; या गोष्टी वाचा, व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:12 PM2018-12-17T12:12:52+5:302018-12-17T12:25:07+5:30

काही कपल्समध्ये जर रोज वादविवाद, भांडण होत असतील तर अशा कपल्सच्या नात्याचं दीर्घ भविष्य नसतं, असं म्हटलं जातं. सतत वाद घालणारे कपल्स लवकरच विभक्त होतात आणि एकत्र राहिलेच तर ती केवळ एक तडजोड असते. याउलट ज्या कपल्समध्ये कमी भांडणं होतात, जे नेहमी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात, या लोकांचे नाते दीर्घ काळ टिकून राहतं, असाही समज आहे. पण काही संशोधनकर्त्यांनी आपल्या संशोधनात ही बाब पूर्णतः अयोग्य ठरवली आहे. संशोधनकर्त्यांनुसार, जी जोडपी खूप कमी प्रमाणात भांडतात किंवा भांडतच नाहीत, या लोकांच्या तुलनेत जी जोडपी प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्यावर वाद घालतात, त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती प्रचंड प्रेम असतं. आपला हा तर्क सिद्ध करण्यासाठी संशोधनकर्त्यांनी पाच अशा कपल्सच्या स्वभावाचा अभ्यास केला,जे सतत कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरुन भांडणच करत असतात.

1. एकमेकांचं वेगळेपण स्वीकारतात : तुम्ही एकमेकांना पसंत का करता?, कारण तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी खास गोष्टी दिसल्या आणि त्या तुम्हाला भावल्यादेखील. पण काही वेळानं ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या होत्या, त्याच बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम नसते. प्रेम म्हणजे पार्टनर जसा आहे तसा स्वीकार करणं. ज्या मुद्यांवर तुमचे विचार जुळत नाहीत, त्यावर नक्कीच संवाद घडणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुमचे वास्तविक विचार नाते जपताना मरणार नाहीत. एकूणच एकमेकांचे वेगळेपण स्वीकारा आणि जपा.

2. कमीपणा जाणून घेऊ नका: जर दोघंही एकमेकांच्या गोष्टींबाबत सहमती दर्शवत असतील, तोंडातून निघालेले प्रत्येक वाक्य पूर्ण होत असेल, कोणते प्रश्न निर्माण होत नसतील, तर हे नाते केवळ एक सवय म्हणून आयुष्यात राहील. जोपर्यंत तुम्ही एकमेकांसमोर प्रश्न निर्माण करत नाहीत, तोपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तरी विकास कसा होईल. आपल्यात ज्या काही कमतरता आहेत त्या एकमेकांना सांगा. शिवाय, समजाच तुमच्यातील एखादी कमतरता पार्टनर सांगितली तर वाईट वाटून घेऊन नका. शांतपणे पार्टनर काय सांगतोय, ते ऐका. कदाचित संबंधित कमतरता भरुन काढण्यात त्याचा/तिचा सल्ला फायदेशीरदेखील ठरेल.

3. न घाबरता आपलं मत मांडा : तुम्हाला पार्टनरची एखादी गोष्ट आवडली नाही, किंवा त्याची एखादी सवय खूपच खटकत असेल तरी तुम्ही त्याला/तिला ते उघडपणे सांगू शकत नाही. का? कारण काय तर आपलं नातं कायम टिकून राहावं, नातं खराब होऊ नये यासाठी केली जाणारी तडजोड. पण नात्यात खरंच प्रेम आहे का?, हा प्रश्न तुम्हीच स्वतःला विचारा. एखादं नातं चालवायचं म्हणून चालवण्यासाठी तुम्ही आपल्या पार्टनरकडे उघडपणे काहीही बोलत नाही, हे सत्य आहे. कारण दोन व्यक्तींमध्ये खरंच प्रेम असेल तर न घाबरता बिनधास्तपणे खटकणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत.

4. संवादामुळे वाढते जवळीक : मनात जे आहे, तेच ओठांवरही असल्यास नाते आणि आयुष्य अगदी राईट ट्रॅकवर चालते, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे मनात जे काही आहे ते बोलून दाखवा, भलेही वाद झाले तरी काही समस्या नाही. कारण उगाचच वरवरचं वागण्यामुळे नात्यात दुरावा वाढण्यापेक्षा बोलून मोकळे झालेले केव्हाही बरं. कारण मनात बऱ्याच गोष्टी साठवून ठेवल्यात तर कदाचित एखादे दिवशी त्याचा ज्वालामुखी होऊन स्फोट होईल.  

5. आत्मविश्वास वाढण्यास मदत : जर तुम्ही एखादी गोष्टी आपल्या पार्टनरकडेच उघडपण सांगण्यास घाबरत असाल तर तुम्ही आपलीच मतं जगासमोर मांडू शकाल का?. जी कपल्स न घाबरता आपल्या पार्टनरसमोर कोणतीही गोष्ट बेधडक मांडू शकतात. त्याच व्यक्तींमध्ये जगाविरोधातही आपल्या हक्कासाठी लढण्याची हिंमत असते.