५२३ धावा, ४२ षटकार, ४५ चेंडूंत शतक अन्... पंजाब किंग्सचे कोलकातात ८ मोठे विक्रम!

IPL 2024, KKR vs PBKS :कोलकाताच्या ईडन गार्डनवर इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या सामन्यात गोलंदाजांची निर्दयी धुलाई झाली.. कोलकाता नाईट रायडर्सच्या ६ बाद २६१ धावांचा पंजाब किंग्सने १८.४ षटकांत २ बाद २६२ धावा करून विजय मिळवला.

KKR कडून फिल सॉल्ट ( ७५), सुनील नरीन ( ७१), वेंकटेश अय्यर ( ३९), आंद्रे रसेल ( २४) व श्रेयस अय्यर ( २८) यांनी तुफान फटकेबाजी केली. प्रत्युत्तरात PBKS च्या प्रभसिमरन सिंग ( ५४), जॉनी बेअरस्टो ( नाबाद १०८), रिली रूसो ( २६) व शशांक सिंग ( नाबाद ६८) यांनी सडेतोड उत्तर दिले.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करतानाच्या पंजाब किंग्सच्या २ बाद २६२ धावा या सर्वाधिक धावा ठरल्या. आयपीएल २०२४ मध्ये RCB ने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७ बाज २६२ धावा करून दक्षिण आफ्रिकेचा ४ बाद २५९ ( वि. वेस्ट इंडिज, २०२३) धावांचा विक्रम मोडला होता.

आयपीएलच्या एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक २४ षटकारांचा विक्रम पंजाब किंग्सने नावावर केला. याच आयपीएल पर्वात सनरायझर्स हैदराबादने RCB विरुद्ध २२ आणि SRH ने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २२ षटकारांचा पराक्रम गाजवला होता. पंजाब किंग्सपेक्षा नेपाळने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आशियाई स्पर्धेत मागच्या वर्षी मंगोलियाविरुद्धच्या ३ बाद ३१४ धावांत २६ षटकार खेचले होते.

पुरुषांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत सर्वाधिक ४२ षटकार खेचले गेले. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्यात प्रत्येकी ३८ सिक्स मारले गेले होते.

आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात PBKS vs KKR यांनी ५२३ धावांसह दुसऱ्या स्थानी संयुक्तपणे झेप घेतली. RCB vs SRH यांच्या सामन्यात सर्वाधिक ५४९ धावा चोपल्या गेल्या होत्या. त्यानंतर याच आयपीएलमध्ये SRH vs MI सामन्यात ५२३ धावा उभ्या केल्या गेल्या होत्या.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम पंजाब किंग्सच्या नावावर नोंदवला गेला. त्यांनी KKR विरुद्ध २६२ धावांचा यशस्वी पाठलाग करून २०२० मध्ये RR चा २२४ ( वि. पंजाब किंग्स) आणि RR चाच २२४ ( वि. KKR, 2024) हा विक्रम मोडला.

पुरुषांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलागाचा विक्रमही पंजाब किंग्सने मोडला. त्यांनी २६२ ( वि. कोलकाता) धावांचा पाठलाग करून दक्षिण आफ्रिकेचा २५९ ( वि. वेस्ट इंडिज, २०२३) धावांचा विक्रम मोडला.

पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये शतक झळकावणारा जॉनी बेअरस्टो १३ वा फलंदाज ठरला. आयपीएलमध्ये एका संघाकडून ही सर्वाधिक शतक संख्या आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स ( ८), राजस्थान रॉयल्स ( ७) व चेन्नई सुपर किंग्स ( ७) याचा क्रमांक येतो.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक २८ वेळा प्रतिस्पर्ध्यांनी २०० हून अधिक धावा उभ्या केल्या आहेत आणि या नकोशा विक्रमात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( २७) मागे टाकले.