Abhijit Katake: "काळजावर दगड ठेवून 17 वर्षे लांब ठेवलं...", 'हिंदकेसरी' अभिजीत कटकेची आई भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:01 PM2023-01-09T13:01:24+5:302023-01-09T13:08:12+5:30

Abhijit Katake Family: पुण्याच्या अभिजीत कटकेने यंदाची हिंदकेसरी गदा पटकावली आहे.

हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला.

फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी वर्चस्व राखले आणि हरयाणाच्या सोमविर याला 5-0 अशा गुणांनी पराभूत करत किताबावर नाव कोरले.

अखिल भारतीय ॲमेच्युअर रेसलिंग फेडरेशन यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील शेकडो पैलवानांनी सहभाग घेतला होता. खरं तर चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे दोन मल्ल दाखल झाले होते.

फायनलच्या सामन्यात महाराष्ट्राच्याच पैलवानांमध्ये लढत होईल अशी अपेक्षा होती, मात्र हरयाणाच्या सोमविरने या आशेवर पाणी टाकले आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

पहिल्या उपांत्य फेरीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत हरयाणाच्या सोमविर याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

दुसऱ्या उपांत्य फेरीत कटके याला पुढे चाल मिळाल्याने त्याने फायनलचे तिकिट मिळवले. फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी खेळ दाखवला आणि 5-0 ने मोठा विजय मिळवला.

आपल्या घरातील मुलगा हिंदकेसरी झाल्यानंतर अभिजीतच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. अभिजीतच्या घरच्यांनी त्याला व्हिडीओ कॉल करून अभिनंदन केले आणि कधी येणार याची विचारणा केली.

अभिजीतच्या आईने मुलाच्या विजयाबद्दल म्हटले, "गेली 17 वर्ष तो खेळण्यासाठी माझ्यापासून लांब तालमीमध्ये आहे. विजयामुळे मला इतका आनंद झाला आहे की आमचे अपुरे स्वप्न त्याने हिंदकेसरी होऊन पूर्ण केले. हा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही, आम्ही त्याचे वाघोलीमध्ये जंगी स्वागत करणार आहे."

"अभिजीत 17 वर्ष बाहेर असल्याची कमतरता पुण्यात गेल्यावर जाणवायची. अभिजीतला भेटावं असे वाटायचे पण म्हणतात ना काळजावर दगड ठेवून तालमीत ठेवले, कारण त्याला भेटले की घरची ओढ लागते म्हणून मी त्याला जास्त भेटले नाही", असे अभिजीत कटकेच्या आईने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले.

अभिजीतने आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले असल्याचे त्याच्या चुलत भावाने म्हटले. "अभिजीत आमचा छोटा भाऊ आहे, आमच्या कुटुंबांचे स्वप्न होते की आमच्या घरात महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असावा. पण आज हिंदकेसरी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. तो या आधी महाराष्ट्र केसरी झाला. तीनवेळा महाराष्ट्र केसरी झाला. याचा वेगळाच आनंद आहे."

हिंदकेसरी अभिजीत कटके उद्या 3 वाजता पुण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. विमानतळापासून वाघोलीपर्यंत त्याचे जंगी स्वागत करणार असल्याचे देखील त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.