काशी विश्वनाथाचे मंदिर सोन्याने उजळून निघाले; भाविकाकडून ६० किलोंची सुवर्ण आरास, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:03 PM2022-06-10T15:03:47+5:302022-06-10T15:09:39+5:30

काशी विश्वनाथाचे मंदिर सोन्यानं उजळून निघाले आहे. एका गुप्त दात्यामुळे हे शक्य झाले आहे.

काशी विश्वनाथाचे मंदिर सोन्यानं उजळून निघाले आहे. एका गुप्त दात्यामुळे हे शक्य झाले आहे. भाविकानं दान केलेल्या ६० किलो सोन्याच्या माध्यमातून मंदिराचे गर्भगृह आणि काशी विश्वनाथाच्या गर्भगृहाचे चार दरवाजे सोन्याने मढवले गेले होते. त्यानंतर आता मंदिराच्या बाहेरील बाजूही सोन्याने मढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम जवळपास सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले.

सर्व मंदिरांचे सौंदर्य आणि पोत एकमेकांपेक्षा वेगळे आणि अतुलनीय असले तरी काशी विश्वनाथ मंदिराचे चित्र डोळ्यासमोर येताच मनात सुवर्णशिखर मनात घर करून जातो. १८३५ मध्ये पंजाबचे तत्कालीन महाराजा रणजित सिंह यांनी दोन शिखरांवर २२ मण सोन्याची प्रतिष्ठापना केली होती.

दिल्लीतील एका कंपनीने गर्भगृहाच्या भिंतींवर सोन्याचा मुलामा चढवला आहे. यामध्ये जमिनीपासून आठ फूट उंचीपर्यंत सोन्याचं काम करण्यात आलंय. यानंतर वरपासून दाराच्या चौकटीपर्यंत सोन्याचं काम करण्यात आलेय.. काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेरील भिंतींना सुमारे २३ किलो सोने लावण्यात आले आहे.

गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर सोन्याचा मुलामा चढवल्यानंतर चारही उंबरठ्यांवरून चांदी काढून त्यावर सोन्याचे काम केले जाईल. यासाठी साचाही तयार करण्यात आला आहे, असे मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनी सांगितले. गर्भगृहाच्या आतील सोन्याचा मुलामा असलेल्या भिंती देखील पारदर्शक फायबरने झाकल्या गेल्या आहेत. धुळ आणि धुरापासून संरक्षण करण्यासाठी हे करण्यात आले आहे. हे फायबर शीट देखील काढले जाऊ शकते.

फिनिशिंगचे काम बाकी असून उर्वरित काम पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत संपूर्ण गर्भगृह सोन्याने सजवण्यात आले आहे. शिखरावर आधीच सोन्याचा मुलामा होता. ही योजना नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तयार करण्यात आली होती, परंतु जानेवारीपासून काम सुरू होऊ शकले आणि आता ते अतिशय वेगानं सुरू असल्याची माहिती श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी दिली.

या संपूर्ण कामात जवळपास ६० किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये उद्घाटन झाल्यापासून भाविकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले.

मंदिराच्या गर्भगृहात ३७ किलो सोने बसवण्यात आले असून हे काम यावर्षी महाशिवरात्रीपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. १७८० मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिर बांधले होते. पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी बाबांच्या दरबारात सोने दान केले, त्यावेळी मंदिराचे दोन शिखर सोन्याने सजवले होते.