शिर्डीच्या साईबाबांचा चमत्कार, बिहारच्या वनमंत्र्याचा दावा; "टेबलावर आढळली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 02:33 PM2022-10-14T14:33:12+5:302022-10-14T14:42:50+5:30

शिर्डीच्या साईबाबा तिर्थक्षेत्राची महती केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात आहे. लाखो भाविक दरवर्षी शिर्डी इथे साईबाबांच्या दर्शनसाठी येत असतात. शिर्डी हे साईबाबांचे शहर जगात प्रसिद्ध आहे. साईंचा महिमा, कथा बऱ्याच प्रचलित आहेत.

सबका मालिक एक म्हणजे साईबाबा. साईंबद्दल अनेक कथा चित्रपटाच्या माध्यमातून, सिरियल्सद्वारे लोकांमध्ये पसरल्या आहेत. साईबाबाला मानणारे भक्त प्रत्येक धर्मात आहेत. प्रत्येकाची आस्था शिर्डीच्या साईचरणी आहे. साईबाबांचे चमत्कार अनेकांनी कथेच्या माध्यमातून ऐकले आहेत. चित्रपटातून पाहिले आहेत.

बिहारचे वनमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव हे पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी तेजप्रताप यादव यांनी साईबाबाचा चमत्कार अनुभवायला मिळाल्याचा दावा केला आहे. साईबाबांची मालिका पाहताना त्यांनी मनोमनी बाबांची उदी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी जे घडले ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

तेजप्रताप यादव म्हणाले की, मी शिर्डीच्या साईबाबांची आठवण काढत मनोमनी मलाही बाबांचा आशीर्वाद रुपी उदी प्रसाद मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी माझ्या घरातील कार्यालयात पोहचलो तेव्हा टेबलावर जे काही दिसलं त्याने हैराण झालो.

तेजप्रताप यादव यांच्या टेबलावर साईबाबांची उदी प्रसादाचं पॅकेट आढळले. या उदीचे २ पॅकेट होते. हा एक चमत्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत शिर्डी साईबाबा, भगवान कृष्ण आणि महादेवाची कृपा आहे. माझ्या कुटुंबाला आशीर्वाद म्हणून ही विभूती मिळाली.

तेजप्रताप यादव यांचे वडील लालूप्रसाद यादव, आई राबडी देवी अनेकदा शिर्डीला गेले आहेत. वडील शिर्डी ट्रस्टचे सदस्य आहेत. तेजप्रताप यादव हे शिर्डीच्या साईबाबांसह कृष्ण आणि महादेवाचे भक्त आहेत. साईंचा चमत्कार पाहून लवकरच ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत असं म्हटले.

साईबाबांबद्दल आजही लोकांच्या मनात प्रचंड आस्था आहे. असं बोललं जाते की, जर तुम्ही साईबाबांना मनापासून काही श्रद्धाभावनेने काही मागितले तर ते तुम्हाला जरूर प्राप्त होते. त्यामुळे आजही श्रद्धेने भक्त साईंच्या दर्शनसाठी पायी चालत शिर्डीपर्यंत पोहचतात.

साईबाबांच्या श्रद्धेत उदीचं खूप महत्त्व आहे. साईंची उदी प्रसाद म्हणून अनेकजण ग्रहण करतात. साईबाबांच्या विभूतीने अनेक पीडितांचा त्रास कमी झाल्याची आस्था आहे. शिर्डीला दर्शनासाठी येणारे साईभक्त साईंची विभूती आजही घेऊन जातात, ही विभूती साईंनी पेटवलेल्या अग्नितून तयार होते. जी आजतागायत पेटतीच आहे.

साईबाबांच्या शिर्डी आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडले. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजवर या मंदिरात अनेकदा चमत्कार म्हणाव्या, अशा घटना घडल्याचे सांगितले जाते.

द्वारकामाईतील कोपऱ्यात काही भाविकांना बाबांचा चेहरा दिसल्याची चर्चा मागे खूप पसरली होती. हा कोपरा बाबांच्या हयातीपासून आहे. या कोपऱ्यात बाबा दिवा लावत होते. आजही या कोपऱ्याला पुजारी रोज हार घालतात. साईंच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक शिर्डीत येतात.