“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:15 PM2024-04-27T23:15:33+5:302024-04-27T23:16:46+5:30

Sharad Pawar News: भारताच्या लोकसभा निवडणुकीवर अमेरिकेसह जगाचे लक्ष आहे, असे म्हणत एका आंतरराष्ट्रीय मीडियाचा प्रतिनिधी बारामतीत येऊन भेटल्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला.

sharad pawar said pm modi not believe in communication in satara rally for lok sabha election 2024 | “मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

Sharad Pawar News: गेली १० वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थाच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती भाजपाचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाने बघितले होते. संसदेत विरोधी पक्ष नेता होतो, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावे लागते. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याच्यावर चर्चा करावी लागते आणि एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की, वाजपेयी यांनी त्या काळामध्ये कोणताही महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर, आम्हा लोकांना ते बोलवत असत, चर्चा करत असत, म्हणणे ऐकून घेत असत आणि योग्य तो निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही, कधी ते विरोधकांशी बोलत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केली. 

महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्याच्या दहिवडी येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीवर देशाचेच नाही तर जगाचे लक्ष आहे. एका सभेत कोणीतरी न माहितीचे गृहस्थ दिसले. मी चौकशी केली, की हे कोण आहेत? तेव्हा मला सांगण्यात आले की, अमेरिकेत सर्वात महत्त्वाचे वर्तमानपत्र आहे, त्याचे नाव 'न्यूयॉर्क टाइम्स'. त्याचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आले होते. सभा संपल्यावर मी त्यांची चौकशी केली,  इतक्या लांब तुम्ही आले कसे? तर त्यांनी सांगितले की, भारताच्या निवडणुकीसंबंधी जगाचे लक्ष आहे, अमेरिकेचे लक्ष आहे. त्यातल्या त्यात ही निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात होत आहे आणि म्हणून मला माझ्या कंपनीने महाराष्ट्रात जायला सांगितले म्हणून मी आलो, असा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

मनमोहन सिंग यांनी १११ पत्रकार परिषदा घेतल्या, मोदींनी एकही नाही

सरकारला साधारणपणे दर एक वर्ष झाल्यानंतर एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा पत्रकारांना बोलावून देण्याची पद्धत या देशामध्ये गेल्या अनेक वर्षांची आहे. डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या १० वर्षांच्या काळामध्ये १११ वेळा त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिले आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्यासमोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री होऊन १० वर्षे झाली. या १० वर्षांत आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेणे आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणे हे त्यांनी कधी केले नाही. कारण त्याच्यावर विश्वासच नाही, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.

दरम्यान, आधीचे प्रधानमंत्री असे आहेत. मनमोहन सिंग यांच्यानंतर मोदी आले. महिनाभर पार्लमेंटचे अधिवेशन आले, तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त एक ते दीड तास, ३० दिवसातील एक ते दीड तास ते सभागृहात येणार, बसणार आणि त्यांचे काही विषय असणार तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. याचा अर्थ या देशातील संसदीय लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नव्हता आणि नाही, असे शरद पवार म्हणाले.
 

Web Title: sharad pawar said pm modi not believe in communication in satara rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.