कोट्यवधीचे दागिने, आलिशान कार, 6 घरं; रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा 'इतक्या' कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:19 PM2022-11-16T17:19:14+5:302022-11-16T17:38:20+5:30

BJP Rivaba Jadeja : रिवाबा जडेजाची कोट्यवधींची संपत्ती, दागिने आणि अनेक घरे आहेत. रिवाबाने नामांकनाच्या वेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता, घर, कार, व्यवसाय यासह सर्व माहिती दिली आहे.

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Indian Cricketer Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढवत आहे. रिवाबा हिची एक सामाजिक कार्यकर्ती आणि उद्योजिका म्हणूनही ओळख आहे. ती फूड बिझनेसमध्ये असून रेस्टॉरंट चालवते.

रिवाबा जडेजाची कोट्यवधींची संपत्ती, दागिने आणि अनेक घरे आहेत. रिवाबाने नामांकनाच्या वेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता, घर, कार, व्यवसाय यासह सर्व माहिती दिली आहे.

रिवाबा जडेजाचा जन्म 2 नोव्हेंबर 1990 रोजी गुजरातमधील राजकोट येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव हरदेव सिंह सोलंकी आणि आईचे नाव प्रफुल्लबा सोलंकी आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात रिवाबाने जीटीयू अहमदाबादमधून बीई मेकॅनिकलचे शिक्षण घेतल्याचं सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांच्याकडे एकूण 97.35 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी 70.48 कोटी रुपये रवींद्र जडेजाच्या नावावर आहेत. जंगम मालमत्तेमध्ये रिवाबा-रवींद्र जडेजा यांची एकूण संपत्ती 64.3 कोटी रुपये आहे.

रिवाबा जडेजाच्या नावावर यामध्ये 57.60 लाख रुपयांची मालमत्ता असून रवींद्र जडेजाच्या नावावर 37.47 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे झाले तर दोघांकडे 33.5 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. ही संपूर्ण मालमत्ता फक्त रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. रिवाबा यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांच्याकडे जवळपास एक कोटी रुपयाचे दागिने आहेत. यामध्ये सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. रिवाबा जडेजाने आपल्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. त्याचवेळी पती रवींद्र जडेजाकडे तीन आलिशान कार आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट आणि जामनगर या तीन शहरांमध्ये त्यांची एकूण 6 घरे असल्याचे भाजपा नेत्या रिवाबा जडेजा हिने सांगितले. याशिवाय राजकोट आणि जामनगरमध्ये व्यापारी संकुले आणि दुकाने आहेत. रिवाबावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

रिवाबा जडेजाने सांगितले की राजकोटमधील जड्डू फूड फील्ड रेस्टॉरंटमध्ये त्यांची 50 टक्के भागीदारी आहे. रिवाबा जडेजा राजपूत समाजाच्या करणी सेनेच्य़ाही नेत्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रिवाबाने 2016 मध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाशी लग्न केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रवींद्र जडेजाने आपल्या पत्नीला निवडणुकीत विजयी करण्याचे एका व्हिडीओद्वारे केले. मात्र रवींद्र जाडेजाची बहीण नयना जडेजा हिने रिवाबाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने प्रचार करायला सुरूवात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बिपेंद्रसिंग जाडेजा यांच्यासाठी रविंद्र जाडेजाची बहीण मते मागताना दिसत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला जामनगर उत्तरमधून तिकीट दिले. रिवाबाला निवडणूक लढवण्याचा कोणताही अनुभव नसतानाही हा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला. या जागेवरून सत्ताधारी पक्षाने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांना तिकीट नाकारून त्याजागी रिवाबाला तिकीट मिळाले.