Corona Virus : बापरे! डोकेदुखी, थकवा... कोरोना पाठ सोडेना; नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:26 PM2023-10-04T13:26:52+5:302023-10-04T13:45:52+5:30

Corona Virus : कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला असून त्यामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

कोरोना व्हायरस हा पूर्णपणे संपलेला नाही आणि त्याचा लोकांवर सातत्याने परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांत कोविड-19 च्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली असली तरी आता कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला असून त्यामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

नवीन व्हेरिएंटच्या उदयानंतर, कोविड -19 च्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आणि यूकेच्या बहुतेक भागातील लोकांवर त्याचा परिणाम होत आहे. पिरोला व्हेरिएंट कोरोनाच्या पूर्वी समोर आलेल्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक मानला जातो.

नवा व्हेरिएंट हा लोकांना वेगाने संक्रमित करत आहे. यूके व्यतिरिक्त, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, इस्रायल आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये पिरोला व्हेरिएंटची अनेक प्रकरणं आढळून आली आहेत.

तज्ञांच्या मते, पिरोला व्हेरिएंट कोविड -19 च्या इतर प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक असू शकतो जो आता उदयास आला आहे, जो रोगप्रतिकारक शक्तीला देखील पराभूत करू शकतो.

या व्हेरिएंटमध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स आहेत, ज्यामुळे तज्ञांना त्याचे विश्लेषण करण्यात अडचण येत आहे. BA.2.86 पिरोला व्हेरिएंटच्या कमी प्रकरणांची जागतिक स्तरावर पुष्टी झाली आहे, परंतु ते यूकेच्या बहुतेक भागांमध्ये लोकांना संक्रमित करत आहे.

पिरोला व्हेरिएंट म्हणजेच BA.2.86 व्हेरिएंट हा कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक सब व्हेरिएंट आहे, जो XBB व्हेरिएंटमधून म्यूटेड झाला आहे. पिरोला व्हेरिएंटचा सर्वात मोठा धोका अशा लोकांना आहे ज्यांना यापूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

Covid-19 चा नवीन प्रकार पिरोला व्हेरिएंटने तज्ञांचे टेन्शन वाढवले ​​आहे. पिरोलाच्या व्हेरिएंटबद्दल बोलताना, यामध्ये शिंका येणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, नाक वाहणे आणि सौम्य किंवा तीव्र थकवा यांचा समावेश होतो.

संक्रमित व्यक्तीला पोटाशी संबंधित समस्या, त्वचेशी संबंधित समस्या आणि ताप येऊ शकतो. वर्ल्डोमीटरच्या रिपोर्टनुसार, जगभरात 69.6 कोटी लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, त्यापैकी 66.8 कोटी लोक कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.

आत्तापर्यंत जगभरात कोविड-19 मुळे 69.2 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि 21.08 लाख लोक अजूनही कोरोनाशी लढा देत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.