शाब्बास पोरी! आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं; आधी IPS आणि नंतर IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:53 PM2023-06-05T12:53:23+5:302023-06-05T12:58:14+5:30

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी झालेल्या दिव्या तंवर आता आयएएस अधिकारी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करतात, पण त्यात सर्वांनाच घवघवीत यश मिळतच असं नाही. काही जण आपलं ध्येय गाठण्यासाठी खूप कष्ट करतात आणि य़श संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. दिव्या तंवर यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया.

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी झालेल्या दिव्या तंवर आता आयएएस अधिकारी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दिव्या यांनी AIR 105 सह UPSC परीक्षा 2022 उत्तीर्ण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील महेंद्रगड येथे राहणाऱ्या दिव्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्या आणि त्यांची आई, दोन लहान भावंडांसोबत राहतात. दिव्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आल्या असून नागरी सेवा परीक्षेसाठी त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता.

पहिल्याच प्रयत्नात दिव्या यांना आयपीएस (IPS Divya Tanwar) हे पद मिळाले. दिव्या यांचे वय खूपच लहान होते जेव्हा वडिलांचं छत्र हरपलं. तेव्हापासून त्यांची आई इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम करते आणि घर चालवून मुलांचं पालनपोषण करते.

दिव्या यांनी प्राथमिक शिक्षण निंबी जिल्ह्यातील मनू स्कूलमधून केलं आणि नंतर त्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात गेल्या. त्यांनी सरकारी कॉलेजमधून बीएस्सी पदवी पूर्ण केली आहे. दिव्या अनेकदा मुलांनाही शिकवायच्या.

परीक्षा उत्तीर्ण होण्यात नशिबापेक्षा मेहनतीची भूमिका अधिक असते, असं दिव्या तंवर यांचं मत आहे. जर कोणी हे करण्याचा निश्चय केला असेल तर तो कठोर परिश्रमाच्या जोरावर ते नक्कीच साध्य करतो.

दिव्या यांचे घर खूप लहान आहे पण तिथे राहून त्यांनी तयारी केली. तयारीसाठी त्यांनी कोणतंही प्रशिक्षण घेतलं नाही आणि स्व-अभ्यासाच्या जोरावर आपलं ध्येय साध्य केलं. अभ्यासाबद्दल बोलायचं झालं तर त्या दररोज 10 तास अभ्यास करायच्या आणि कधीही घराबाहेर पडल्या नाहीत.

खाणे, अभ्यास आणि झोपणे, हे त्याचे तयारीचे वेळापत्रक होते. दिव्या यांनी यशाचे श्रेय आईला दिलं आहे. जिने नेहमी आपल्या मुलीचा हात धरला आणि तिला वडिलांची उणीव कधीच जाणवू दिली नाही. आईने स्वतः मजूर म्हणून काम केलं पण दिव्याच्या तयारीत कोणतीही अडचण येऊ दिली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.