मोदी सरकारमधील दोन मंत्र्यांसह हे दिग्गज आहेत जेएनयूचे माजी विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:49 PM2020-01-13T15:49:25+5:302020-01-13T16:10:24+5:30

दिल्लीतील प्रसिद्ध शिक्षणसंस्था असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सध्या विविध कारणांमुळे वादात सापडलेले आहे. मात्र येथील काही विद्यार्थी संघटनांच्या राजकीय भूमिकांवरून वाद होत असले तरी दर्जेदार शिक्षणाच्याबाबतील जेएनयूचा हात कुणी धरू शकत नाही. त्यामुळेच जेएनयूमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी आज केंद्रातील सरकारपासून विविध ठिकाणी उच्चपदावर कार्यरत आहेत. आज जाणून घेऊ जेएनयूमधील अशाच प्रसिद्ध विद्यार्थ्यांविषयी.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांचे उच्च शिक्षण जेएनयूमध्ये पूर्ण झाले होते. त्यांनी येथून अर्थशास्त्रामध्ये मास्टर्सची पदवी घेतली होती.

देशाची माजी परराष्ट्र सचिव आणि सध्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सुद्धा जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जेएनयूमध्ये परराष्ट्र संबंधांबाबत डॉक्टरेट केली होती.

2019 मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी हे सुद्धा जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत.

सीरियाचे माजी पंतप्रधान अली झैदान यांनी जेएनयूमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते.

नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराई यांनीसुद्धा जेएनयूमधून उच्चशिक्षण घेतले होते.

ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते सीताराम येचुरी हे सुद्धा जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया संस्थेचे संस्थापक योगेंद्र यादव यांनीसुद्धा 1981 ते 1983 या काळात जेएनयूमधून उच्चशिक्षण घेतले होते.

अफगाणिस्तानचे आर्थिक विषयक मंत्री अब्दुल सत्तार मुराद यांनीसुद्धा जेएनयूमधून उच्चशिक्षण घेतले होते.

नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीसुद्धा जेएनयूमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जेएनयूमधून मास्टर्स पदवी घेतली होती.