CoronaVirus News: चेन्नईतल्या त्या मॅनेजरनं कोरोनाचं 'औषध' स्वत:वरच टेस्ट केलं अन् पुढे आक्रितच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 12:47 PM2020-05-10T12:47:07+5:302020-05-10T13:02:16+5:30

जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ४० लाख ५० हजारांवर गेल्याने सर्वच देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने २ लाख ७८ हजार ८०० जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी सुमारे ७९ हजार मृत्यू एकट्या अमेरिकेतील आहेत.

भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत चालली आहे. देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 62939 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2109 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लवकरच लस तयार केली जाईल असा विश्वास भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तामिळनाडूमधील हर्बल प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीतील कंपनीतील फार्मासिस्ट आणि प्रॉडक्शन मॅनेजरने कोरोनाच्या उपचारासाठी बनवलेल्या औषधाची चाचणी स्वत:वर केली होती. मात्र यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

हर्बल प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीतील मृत फार्मासिस्ट आणि प्रॉडक्शन मॅनेजरने आणि कंपनीतील त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कोरोनाच्या उपचारासाठी बनवलेल्या औषधाची चाचणी केली.

चाचणी केल्यानंतर काही तासातच प्रकृती ढासळल्याने दोघही चक्कर येऊन कोसळले. त्यामुळे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शरिरात औषधाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याबाबत तपास करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.