स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:13 PM2020-08-24T18:13:06+5:302020-08-24T18:35:46+5:30

भारत स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने एकूण १९ नेत्यांना अध्यक्ष पदावर नियुक्त केले आहे. त्यापैकी नेहरू-गांधी घराण्याचे पाच लोक आहेत. २०१७ मध्ये ज्यावेळी राहुल गांधी यांना पक्षाची कमान सोपविण्यात आली, त्यावेळी ते या कुटुंबातील पाचवे सदस्य होते. सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव सर्वात प्रदीर्घ अध्यक्ष होण्याची नोंद आहे. त्यांनी १९ वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाची धुरा देण्यात आली होती. दरम्यान, काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष जास्त काळ हे पद सांभाळू शकले नाहीत.

ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी आचार्य कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. पंतप्रधान पदासाठीच्या मतदानात सरदार वल्लभ पटेल यांच्यानंतर सर्वाधिक मते कृपालानी यांना पडली होती. मात्र, महात्मा गांधी यांच्या सांगितल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आपली नावे मागे घेतली होती.

पट्टाभी सीतारमय्या कट्टर गांधीवादी होते. १९३९ मध्येही पट्टाभी सीतारमय्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. मात्र, सुभाषचंद्र बसू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. १९४८ च्या अधिवेशनात पट्टाभी सीतारमय्या काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. १९५० पर्यंत ते अध्यक्ष राहिले.

पुरुषोत्तम दास टंडन यांनी १९५० मध्ये आचार्य कृपलानी यांचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्षपद मिळवले. पण १९५१ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९५२ मध्ये अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक जिंकली. पुढील वर्षी त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना पाच वर्षांपर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. स्वातंत्र्यानंतर नेहरू-गांधी घराण्यातील ते पहिले काँग्रेस अध्यक्ष होते.

उच्छंगराय नवलशंकर ढेबर हे काँग्रेसचे पाचवे अध्यक्ष होते. पक्ष अध्यक्ष म्हणून त्यांचे पहिले काम होते, ते म्हणजे देशसेवेसाठी मोठ्या नेत्यांना एकत्र आणणे. याशिवाय, ते एसएसटी आयोगाचे अध्यक्षही होते. त्यांतर त्यांनी राजकोट लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुद्धा केले होते.

वडिलांप्रमाणेच इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जवळपास पाच वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. पहिल्यांदा १९५९ मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या होत्या. त्यानंतर आणीबाणीनंतर १९७८ मध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.

नीलम संजीव रेड्डी 1960 ते १९६४ दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आले. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होता.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे प्रमुख गैर गांधी अध्यक्ष राहिलेले कामराज यांनी १९६० च्या दशकातील किंगमेकर म्हणून ओळखले जाते. ते दोनवेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९६४ ते १९६७ या काळात काँग्रेसचे अध्यक्ष असताना नेहरू यांच्या निधनानंतर त्यांनी शास्त्री आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान होताना पाहिले.

एस निजलिंगप्‍पा काँग्रेसचे नववे अध्यक्ष होते. १९६८ ते १९६९ दरम्यान जेव्हा काँग्रेस १९६७ च्या निवडणुकीत पराभव पचवत होती, तेव्हा ते अध्यक्ष होते, १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. एस. निजलिंगप्पा अविभाजित काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष होते.

पी. मेहुल १९६९ ते १९७० दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते.

बाबू जगजीवन राम यांनी १९७० ते १९ ७२ दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.

भारताचे नववे राष्ट्रपती होण्याआधी शंकर दयाल शर्मा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रालये सांभाळली होती.

आसाममधून येणारे देवकांत बरुआ हे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी अध्यक्ष होते.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली. ते १९९१ पर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर होते.

दोनवेळा रेल्वेमंत्री राहिल्यानंतर कमलापती त्रिपाठी यांनी १५ वे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ते १९९२ पर्यंत अध्यक्षपदावर होते.

पी. व्ही. नरसिम्हा राव यांनी पंतप्रधान असताना काँग्रेसचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले होते. देशाची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी त्यांना ओळखले जाते.

नरसिम्हा राव यांच्या राजीनाम्यानंतर सीताराम केसरी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९९७ मध्ये त्यांनी एचडी देवेगौडा सरकार पाडले होते. त्यांचा हा निर्णय सर्वात वादाचा मानला जातो. त्यानंतर आईके गुजराल यांच्या सरकारचे समर्थनही काँग्रेसने काढून घेतले होते. तसेच, केसरी यांना पक्षातून काढण्याची घटना सुद्धा मोठ्या वादाची ठरली.

१९९८ मध्ये काँग्रेस राजकीय संकटात सापडले होते. त्यामुळे काँग्रेसला उभारी देण्यासाठी नेत्यांनी पुन्हा गांधी घराण्याकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आणि सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी तब्बल १७ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या. त्यांच्या नेतृत्वात २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस सत्तेत होती.

राहुल गांधी २०१७ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारून पराभव झाला. पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.