Corona Vaccine: देशात आतापर्यंत किती टक्के लसी वाया गेल्या? ‘या’ राज्याने वाया घालवले सर्वाधिक डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 05:45 PM2021-05-26T17:45:16+5:302021-05-26T17:50:16+5:30

Corona Vaccine: देशात आतापर्यंत कोरोना लसींचे किती डोस वाया गेले तसेच कोणत्या राज्यात सर्वाधिक लसी वाया गेल्या, यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केली आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत.

कोरोनावरील नियंत्रणासाठी लस हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच भारतासह जागतिक पातळीवरील देशांमध्ये कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे.

केवळ भारताचा विचार केल्यास आताच्या घडीला कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसींचा वापर लसीकरण मोहिमेत करण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत २० कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालेले आहे.

मात्र, देशात लसी वाया घालवण्याचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मोठ्या प्रमाणावर लसींचे डोस वाया गेले असून, झारखंडमध्ये सर्वाधिक लसी वाया गेल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लशींच्या ३७.३ टक्के लसी वाया घालवल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये एकूण लसींच्या ३०.२ टक्के लशी वाया गेल्या आहेत.

तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लसी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लशी वाया गेल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत केंद्राची माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे कोविन पोर्टलवर योग्य डाटा पोहोचू शकला नाही.

लसींची नासाडी होणार नाही, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. पण आकडेवारीत वाया घालवण्याचे प्रमाण चुकीचे आहे. आतापर्यंत एकूण लसींच्या ४.६५ टक्के लसी वाया गेल्या आहेत, असे स्पष्टीकरण हेमंत सोरेन यांनी दिले आहे.

देशभरात लसीकरणाचे आकडा २० कोटीच्या पुढे गेला आहे. त्यापैकी ११.३ कोटी लोकांना फक्त पहिला डोस मिळाला आहे. तर, ४.३५ कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

सुमारे २० कोटी डोसपैकी २० टक्के लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटातील ६.४ टक्के आणि उर्वरित ७३.६ टक्के डोस ४५ वर्षांवरील वयाच्या लोकांना देण्यात आले आहेत.

देशात आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना एकूण ७.५ कोटी, यापैकी ५.७ कोटी लोकांना पहिला तर १.८ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

तर ४५ ते ६० या वयोगटातील ७.२ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. यात ६.२ कोटींना पहिला डोस दिला गेला आणि एक कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.