इंटरव्यूमध्ये फेल होताच सर्टिफिकेट जाळले, यूट्यूबवर कोडिंग शिकून उभारली कोट्यवधींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 11:46 AM2024-01-28T11:46:47+5:302024-01-28T12:10:42+5:30

दिलखुश कॅब सेवा पुरवणारी रॉडबेझ कंपनी चालवतो. मॅट्रिक उत्तीर्ण दिलखुशने ही कंपनी सुरू करण्यासाठी कोणताही कोर्स किंवा प्रशिक्षण घेतलं नाही

काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असेल आणि ध्येय निश्चित असेल तर कोणतीही गोष्ट करणं अवघड नाही. बिहारमधील दिलखुश नावाच्या एका व्यक्तीची अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे, ज्याने मॅट्रिक पास झाल्यानंतर नोकरीसाठी मुलाखत दिली आणि त्यात फेल झाल्यानंतर त्याची सर्व सर्टिफिकेट जाळून टाकले.

काहीतरी वेगळं करण्याचा विचार तेव्हा त्याच्या मनात दाटून आला होता. त्यानंतर या व्यक्तीने यूट्यूबवरून कोडिंग शिकून स्वतःची कॅब सेवा कंपनी सुरू केली. आता त्याच्या Rodbez कंपनीला Sharks चा पाठिंबा मिळाला आहे.

दिलखुश कॅब सेवा पुरवणारी रॉडबेझ कंपनी चालवतो. मॅट्रिक उत्तीर्ण दिलखुशने ही कंपनी सुरू करण्यासाठी कोणताही कोर्स किंवा प्रशिक्षण घेतलं नाही, तर यूट्यूबवरून कोडिंग शिकून हे कॅब सर्व्हिस एप तयार केलं.

शार्क टँकचे जज त्याच्या पराक्रमाने प्रभावित झाले आणि त्यांनी लाखो रुपये त्याच्या कंपनीत गुंतवले. दिलखुशचे वडील बिहार रोडवेजमध्ये काम करायचे आणि यापासून प्रेरित होऊन त्याने आपल्या कंपनीचं नाव RodBez ठेवलं.

दिलखुशने मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखत दिली होती पण त्याच दरम्यान त्याला एपल कंपनीचा लोगो ओळखता आला नाही आणि तो त्यामध्ये फेल झाला.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व सर्टिफिकेट जाळून टाकल्यानंतर तो वडिलांकडून ड्रायव्हिंग शिकला. मग एका बांधकाम कंपनीत काम करून काही पैसे सेव्ह आणि आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या दिशेने वाटचाल केली.

दिलखुशने 2016 मध्ये सहरसा येथे आपली पहिली कंपनी उघडली आणि पैसे गुंतवले आणि अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्सना कामावर घेतलं, परंतु 2021 मध्ये त्याने ही कंपनी सोडली कारण त्याच्या मनात काहीतरी वेगळं होतं.

जुलै 2022 मध्ये, बिहारची राजधानी पाटणाला प्रत्येक गाव आणि शहराशी जोडण्यासाठी रॉडबेझ नावाचे कॅब सेवा एप लॉन्च केलं. सध्या, रॉडबेझकडे 20 टॅक्सी आहेत. टॅक्सींची संख्या 20 वरून 200 पर्यंत वाढवण्याचे दिलखुशचं स्वप्न आहे.

या कॅब एपची खास गोष्ट म्हणजे कंपनीचा कर्मचारी प्रवाशाने बुक केलेली कॅब मिळेपर्यंत त्याच्या संपर्कात असते. आता शार्क टँक इंडियाच्या जजनी त्याच्या कार्याचं कौतुक केलं आहे आणि व्यवसाय विस्तारासाठी आर्थिक मदत देखील केली आहे.