Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 09:00 PM2022-06-18T21:00:36+5:302022-06-18T21:12:57+5:30

Agneepath Agneeveer Protest : वायुसेना प्रमुख व्हीआर चौधरी यांनी अग्निपथ योजनेबाबत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेकजण रस्त्यावर उतरले आहेत. तोडफोड, जाळपोळ, हाणामारी, लूटमारीसारखे अनेक प्रकार सध्या घडताना दिसतायत. परंतु यानंतर एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी एक इशारा दिला आहे.

हिंसक आंदोलनात सहभागी झालेल्यांना नंतर याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. “आम्ही अशा हिंसाचाराचा निषेध करतो. कारण अशा प्रकारचा विरोध हा उपाय नाही. आंदोलन करणाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशनदरम्यान क्लिअरन्स देण्यात येणार नाही,” असं हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी यांनी इंडिया टुडे-आज तकशी बोलताना सांगितलं.

अग्निपथ योजना हा सकारात्मक उपक्रम आहे. ज्यांना या योजनेबाबत कोणत्याही प्रकारची चिंता किंवा भीती असेल त्यांनी जवळच्या लष्करी तळ, हवाई दल किंवा नौदलाच्या तळाशी संपर्क साधून त्यांच्या शंका दूर करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आंदोलन करण्यापेक्षा युवा योजनेची योग्य माहिती मिळवा, त्या बारकाईने समजून घ्या. तेव्हाच या योजनेचे फायदे समजतील. योजना समजून घेतल्यावर सर्व संभ्रम आणि शंका दूर होतील याची मला खात्री आहे, असा विश्वासही हवाईदल प्रमुखांनी व्यक्त केला.

४ वर्षांच्या कार्यकाळात युवक केवळ देशाची सेवा करतील असे नाही, तर सेवानिवृत्तीनंतर ते शिस्तबद्ध होतील. नोकरी शोधणाऱ्यांच्या चिंता आणि भीती दूर करण्यासाठी सरकार आणि संरक्षण सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. योजना लागू केल्यानंतर त्यात काही बदल किंवा सुधारणांची गरज आहे का, हेही पाहिले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी भारतीय हवाई दलाची निवड प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार असल्याची घोषणा यापूर्वी हवाईदल प्रमुखांनी केली होती. यासोबतच वयोमर्यादा २३ वर्षे करण्याबाबत ते म्हणाले की, यामुळे तरुणांचा मोठा वर्ग भरतीच्या नवीन मॉडेलमध्ये नावनोंदणी करू शकेल.

मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार सरकारने १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली होती, मात्र परिस्थिती अजूनही तशीच आहे. या आंदोलनात रेल्वेच्या मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

“रेल्वे परिसरात झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्ये २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलकांनी रेल्वेचे ५० डबे आणि ५ इंजिने जाळली, ज्यांचं आता पूर्णपणे नुकसान झालं आहे. याशिवाय आंदोलकांनी प्लॅटफॉर्म, कम्प्युटर्स आणि इतर अनेक उपकरणांचे नुकसान केले आगे. या आंदोलनामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम प्रभात कुमार म्हणाले यांनी दिली.