भाजपा नेत्यांचं अगाध ज्ञान.... वाचा दहा 'अनमोल वचनं'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 02:22 PM2018-06-04T14:22:46+5:302018-06-04T14:22:46+5:30

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी नुकतेच केलेले विधान देशभरात चांगलेच गाजले होते. सीतेचा जन्म टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने झाला होता. जमिनीत पुरलेल्या एका मडक्यात सीता मिळाली. याचा अर्थ रामायणकाळातही टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान अस्तित्त्वात होते, अशी मुक्ताफळे शर्मा यांनी उधळली होती.

दिनेश शर्मा यांनी आणखी एका कार्यक्रमात पत्रकारितेची सुरुवात महाभारत काळात झाल्याचे म्हटले होते. त्याकाळी संजयाने धृतराष्ट्राला युद्धभूमीवरील कथन केलेला वृत्तांत म्हणजे त्याकाळीही थेट प्रसारणाची सोय असल्याचा पुरावा आहे. तर नारदमुनी म्हणजे त्यावेळचे गुगल होते, असे शर्मा यांनी सांगितले.

त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देवही आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत होते. महाभारताच्या काळात इंटरनेट आणि सॅटेलाईटसारख्या सुविधा अस्तित्त्वात असल्याचा दावा बिप्लब देव यांनी केला होता.

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह हे त्यांच्या निष्क्रियतेबरोबरच वादग्रस्त विधानांसाठीही ओळखले जातात. सध्या देशभरात सुरु असलेला शेतकरी संप म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचे विधान करून राधामोहन सिंह यांनी वाद ओढावून घेतला होता.

वाचाळपणासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अररिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत वादग्रस्त विधान केले होते. अररिया जिल्हा नेपाळ व बांगलादेशच्या सीमावर्ती परिसराल लागून आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपाचा पराभव झाल्यास अररिया दहशतवाद्यांचा गड होईल, असे सिंह यांनी म्हटले होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी मध्यंतरी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. महिलांनी आपल्या सीमा ओलांडता कामा नये. रामायणात सीतेने लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा ओलांडली आणि रावणाने तिला पळवून नेले. त्याचप्रमाणे स्त्रियांनी आपल्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागेल, असे विजयवर्गीय यांनी म्हटले होते.

मध्यंतरी देशभरात कथुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरून जनमत प्रक्षुब्ध झाले असताना भाजपाचे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी वादग्रस्त विधान केले होते. बलात्काराच्या घटना दुर्देवी आहेत. मात्र, त्या रोखता येऊ शकत नाहीत. सरकार सगळीकडे लक्ष ठेवून आहे, दोषींवर कारवाईही होत आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडल्यास त्याचा इतका गवगवा करू नये.

आपल्या स्फोटक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी हिंदू महिलांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महिलांनी किमान चार अपत्यांना जन्म दिला पाहिजे, असे साक्षी महाराजांनी म्हटले होते.

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज आपल्या वादग्रस्त विधानांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निपाह विषाणूची उपमा दिली होती. राहुल गांधी हे निपाहप्रमाणे आहेत, जिथे जातील तो पक्ष संपेल, असे विज यांनी म्हटले होते.

मुलींना प्रियकर नसेल तर बलात्कारासारख्या घटना बंद होतील, असे विधान मध्य प्रदेशातील भाजपा आमदार पन्नालाल यांनी केले होते. त्यापूर्वी पन्नालाल यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मालाही लक्ष्य केले होते. विराट कोहली व अनुष्काने भारताबाहेर जाऊन लग्न केले. यावरून त्यांना देशाविषयी प्रेम आणि राष्ट्रभक्ती नसल्याचे पन्नालाल यांनी म्हटले होते.